अहमदनगर हादरले ! अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला समजली ! संतप्त नवऱ्याने पत्नीची हत्या करून मृतदेह खड्डयात पुरून टाकला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पतीला प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून करण्यात आला आहे. ही घटना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथे नुकतीच घडली. रुपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

विशेष म्हणजे या घटनेबाबत पतीने पुरावा नष्ट करण्याचा बनाव केला होता. हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.

याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत महिलेचा भाऊ रोहित मडके (रा. फक्राबाद, ता. जामखेड), यांच्या फिर्यादीवरून ज्ञानदेव पोपट आमटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याच्या मयत पत्नीला होती. याबाबत तिने पतीला विचारणा केली.

याचा राग येऊन आरोपीने दि. १० नोव्हेंबर रोजी घराच्या शेजारी मोठा खड्डा तयार करून पत्नीची क्रूर हत्या केली व पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने आरोपीने पत्नीचा मृतदेह कापडामध्ये बांधून घराच्या बाजूला आगोदरच खोदलेल्या खड्डयात पुरून टाकला.

आपण केलेले कत्य कोणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी आरोपीने त्याच्या मयत पत्नीला श्रीगोंदा येथे पार्लरसाठी नेऊन सोडले आणि त्यानंतर ती घरी माघारी आली नसल्याचे तिच्या माहेरच्यांना सांगत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हरविल्याची खोटी तक्रार दिली.

तसेच मयत महिलेच्या भावाला सोबत घेऊन परिसरात शोध घेतला. महिला मिळून न आल्याने मयत महिलेच्या भावाला तिच्या पतीवर संशय आल्याने त्याने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी आणि त्याची पत्नी हे दोघेही श्रीगोंदा येथे गेले नसल्याचे लक्षात येताच त्याने आरोपीच्या घराच्या परिसरात शोध घेतला,

तेथे नुकताच बुजविलेला खड्डा उकराला असता, घाण वास आल्याने पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी जाऊन पंचासह पाहणी करत खड्डा उकरला असता, कपड्यात बांधलेला महिलेचा मृतदेह आढळून आला.

यावरून सदर महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आरोपीने मोबाईल बंद करून पलायन केले. आरोपीच्या शोधार्थ पथके पाठविल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe