प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करून पेटवणाऱ्या निर्दयी आरोपीला अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपी अविनाश राजुरेला अटक करण्यात आली आहे.

अविनाश घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान त्याला रविवारी सायंकाळच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील आदमपूर येथील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली.

त्यानंतर त्याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.\ ऐन दिवाळीत नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी असलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर प्रियकराने ॲसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात सुमारे ४८ टक्के भाजलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबानुसार नेकनूर (ता. बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या एका दिवसात आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. सविस्तर वृत्त असे की, पीडितेचा तीन महिन्यांपूर्वी अन्य एका मुलाशी विवाह झाला होता.

मात्र, तिचे गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत प्रेम होते आणि ते दोघे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ देण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघेही गावातून पलायन करून पुण्यात एकत्र राहत होते. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले.

दरम्यान दिवाळीनिमित्त शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर अ‍ॅसिड टाकले.

त्यानंतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. हे कृत्य करून अविनाशने तिला त्याच स्थितीत सोडून तेथून पळ काढला.

अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी रस्त्यालगत तब्बल १२ तास पडून होती. शनिवारी दुपारी २ वाजता काही वाहनचालकांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe