वाद मिटवल्याच्या रागातून माय लेकाकडून पती पत्नीला मारहाण

Published on -

१३ फेब्रुवारी २०२५ राहुरी : वाद मिटविल्याचा राग मनात धरून माय-लेकाने पती-पत्नीला शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की विलास अंबादास बर्डे (वय ४५, रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या चुलत भाऊ संदिप भिमा बर्डे आणि भाचा आकाश रमेश पगारे यांच्यात वाद झाला होता.

हा वाद विलास बर्डे आणि इतर नातेवाईकांनी मिटवला होता. याचा राग संदिप बर्डे याच्या मनात होता. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास, विलास बर्डे आणि त्यांची पत्नी साखरबाई घरासमोर उभे असताना संदिप बर्डेने विलास बर्डे यांचा मुलगा सुनिल बर्डे याला शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

भांडण सोडवण्यासाठी विलास बर्डे आणि त्यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी संदिप बर्डे आणि त्याच्या आईने त्यांनाही शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच, “तुम्ही आमच्या नादी लागलात तर सोडणार नाही” अशी धमकी दिली.

विलास अंबादास बर्डे यांच्या फिर्यादीवरून संदिप भिमा बर्डे आणि त्याच्या आईवर (रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी) यांच्यावर शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!