नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ३० वर्षीय विवाहितेने मुळा कालव्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे व दिरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विवाहितेचे वडील राजेंद्र मारुती वालतुरे (रा. घुमनदेव, तालुका श्रीरामपूर) यांनी सोनई ‘पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले, की मोनिका रामकृष्ण पटारे (वय ३०) हिला माहेरून पिकअप गाडी घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन येण्यास पती रामकृष्ण शिवाजी पटारे, सासरे शिवाजी पटारे, सासू शांताबाई शिवाजी पटारे, दीर अनिल शिवाजी पटारे यांनी वारंवार सांगितले. त्यामुळे या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २७ जानेवारी रोजी देडगाव कालव्याच्या जाळीमध्ये मृतदेह सापडला. पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके करत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.