महाराष्ट्रात गाजलेले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ पान स्टॉल पुन्हा सुरु ! प्रशासन पुन्हा हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे काय ?

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News :- कुलकर्णी हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घालून देखील सिताराम सारडा विद्यालयाच्या १०० मीटर आवारात ते पान स्टॉल पुन्हा सुरु झाले आहे. यावेळी माञ टपरी ऐवजी एका गाळ्यात सुरू झाले आहे. मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन दोन आठवडे होत नाही तोच पुन्हा शाळेच्या आवारात राजरोसपणे धंदा सुरू झाले आहे.

शहर जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली असून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शाळा परिसर तंबाखूमुक्त करून मुलांना खुल्या वातावरणात श्वास घेऊ द्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देत चर्चा करण्यात आली. प्रशासन पुन्हा हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल काळे यांनी प्रशासनाला केला आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सुरू असणाऱ्या पानाच्या गाळ्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. तसेच शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाच्या जीआरची प्रत देऊन लक्ष वेधण्यात आले. तातडीने कारवाईची मागणी काँग्रेसने केली. काळे यावेळी म्हणाले, शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांचे भवितव्य मटका, बिंगो, जुगार, तंबाखू, गुटखा, मावा अशा व्यसनाभोवती अडकविले जात आहे.

सरकार स्वतः जीआर कडून गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचा केवळ दिखावा केला. मात्र प्रत्यक्षात पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. काँग्रेस हे खपवून घेणार नाही. यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कुणालाही आपले पाल्य हे व्यसनाधीन, जुगारी व्ह्यावेत असे वाटत नाही. त्यामुळे काँग्रेस अशा अवैध धंद्यांना खपवून घेणार नाही.

काळे पुढे म्हणाले, याबाबत पोलीस, मनपा तसेच अन्न व औषध विभाग परस्परांकडे बोट दाखवीत असून कोणी ही यावर सक्षमपणे कारवाई करण्यास तयार नाही. केवळ टोलवाटोलवी सुरू आहे. अवैध धंद्यांना प्रशासनाचा पाठिंबा आहे का ? असा प्रश्न पालक आणि समाजामध्ये निर्माण झाला आहे. कारण प्रशासनाच्या पाठिंब्याशिवाय हे चालू शकत नाहीत.

शहर आधीच ताबा प्रकरणे, हत्याकांड, रखडलेला विकास, रस्त्यांची दुरवस्था यामुळे वेठीस धरले गेले आहे. प्रशासन स्वतःहून कारवाई करत नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेसने नगर शहरामध्ये अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

यापूर्वी नगर शहरामध्ये हिंदुत्ववादी चळवळीत काम करणाऱ्या ओमकार उर्फ गामा भागानगरे या युवकाचे हत्याकांड हे अवैध धंद्यांची तक्रार केल्याच्याच कारणावरून घडलेले आहे. प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे अशा अवैध धंद्यांची तक्रार केल्यामुळे अवैध धंदे करणारे या विरोधात तक्रारी करणाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करतात. हा या शहराचा रक्तरंजित इतिहास आहे.

असे असतानाही कारवाई करण्याच्या मागणीच्या रागातून पुन्हा कुलकर्णी अथवा काँग्रेस कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले झाले तर याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का ? प्रशासन पुन्हा अजून एक हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल यावेळी काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.

अन्यथा पालकमंत्री शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन :
पुढील ४८ तासांच्या आत कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. कारवाई न झाल्यास येत्या सोमवारी पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने ढोल बाजाओ आंदोलन करण्यात येईल.

तरीही प्रश्न सुटला नाही तर मात्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच कारवाई होईपर्यंत नगरमध्ये शिक्षण मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही. तसा नैतिक अधिकार त्यांना उरत नाही. याची सर्वस्वी जबाबदारी अहमदनगर जिल्हा प्रशासनावर राहील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe