Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ प्रसिद्ध मंदिरात चोरी, ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन लंपास,ग्रामस्थ संतप्त

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाली. सोमवारी (दि.१२) रोजी मध्यरात्री ही घटना घडली. चोरट्यांनी सुमारे ५० किलो अंदाजे ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरुन नेले असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मुख्य दरवाजा कटवणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश केलं. चोरटयांनी मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे सुमारे ५० किलो वजनाचे अंदाजे ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरून नेले आहे. मंदिरातील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.

दरम्यान दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दिसली. त्यांना दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी  मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना फोन करून याबाबत माहिती दिली.  

घटना समजताच पुजारी धुमाळ यांनी मंदिराकडे धाव घेतली. त्यानंतर चोरीची ही माहिती  श्रीगोंदा पोलिस ठाण्यात देण्यात आली. गावात ही माहिती समजताच गावकरी गोळा झाले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मंदिरात पाहणी करत इतर माहिती गोळा करण्यास सुरवात केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.   श्वान पथक, ठसे तज्ञ पथकाला याठिकाणी बोलवण्यात आले. घटनेची माहिती दिल्यानंतर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग हे घटनास्थळी आले होते.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करून तपास सुरू केला होता. दरम्यान, श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या घटनेने ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध सभा घेत  या सभेमध्ये ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत चोरट्यांचा शोध तत्काळ घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe