श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण नगर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई श्रीरामपूर पोलिसांनी केली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की २२ जून रोजी नगरपरिषदेच्या निवृत्त कर्मचारी लता गोविंद शिंदे (रा. लक्ष्मीनारायण नगर, गोंधवणी रोड, वार्ड नं. १, ता. श्रीरामपूर) या अहमदनगर येथे अहमदनगर येथे नातीचे लग्न असल्याने घराला कुलूप लावून कुटुंबियांसह गेल्या होत्या.
२८ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील १ लाख ६० हजार रुपये रोख व सुटकेसमध्ये ठेवलेले लहान मुलाचे २ तोळे सोन्याचे दागिणे व पितळी टिप असा एकुण २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास या गुन्ह्यातील मालाचा व आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाने तपास सुरू केला. दरम्यान हा गुन्हा आरबाज ऊर्फ भैय्या इजाज बागवान (वय २३ वर्षे, रा. संजयनगर, वॉर्ड नं. २. श्रीरामपर) तसेच इरफान ऊर्फ इप्या मैनुउद्दीन सय्यद (वय २३ वर्षे, रा. मिल्लतनगर, वॉर्ड नं. १, श्रीरामूपर) तसेच एका अल्पवयीन मुलाने केला असल्याची माहिती पथकाला मिळाली.
११ जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे बस स्टॅण्ड परिसरात राहत आहेत. खात्रीशिर बातमी मिळाल्याने तपास पथक तात्काळ दौंड येथे रवाना झाले. बस स्टॅण्ड परिसरात शोध घेऊन बागवान व सय्यद यांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्याकडुन गुन्हयातील मुद्देमालापैकी ७६ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. अल्पवयीन मुलाचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, रमिझराजा अत्तार, संभाजी खरात, अजित पटारे, रामेश्वर तारडे, मिरा सरग, पोलीस नाईक संतोष दरेकर, सचिन धनाड. वेताळ यांनी केली आहे.