Ahmednagar Crime : अहमदनगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने शहरातील ख्रिस्तगल्ली व मार्केट यार्ड येथून छापा मारत कर चुकवून आणलेली ७२ लाखांची रोकड जप्त केली. या रकमेची निवडणूक शाखेने नियुक्त केलेल्या समितीकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
चेतन पटेल (रा. ख्रिस्तगल्ली) व आशिष पटेल (रा. मार्केट यार्ड, नगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ख्रिस्तगल्ली येथे छापा मारून चेतन पटेल यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे ६० लाख ९० हजार रुपये आढळले. ही रक्कम त्याने कर चुकवून आणली असल्याचे समोर आल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर मार्केट यार्ड येथे दुसरा छापा मारण्यात आला. तेथून आशिष पटेल यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ लाख ३४ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकापाठोपाठ एक दोन ठिकाणी छापे मारत ७२ लाखांची रोकड जप्त केली.
रोख रकमेसह दोघांना कोतवाली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, निवडणूक शाखेकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडून चौकशी करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही तपास सुरु होता.
दोघे मूळचे गुजरातचे
स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले दोघे मूळचे गुजरात येथील राहणारे आहेत. ते व्यवसायानिमित्त नगर शहरात स्थायिक आहेत. त्यांनी रक्कम कशासाठी आणली होती? याबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत असून, या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, याची समितीकडून चौकशी करण्यात येत आहे.