Free School Uniform | राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणार आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एकूण 248 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. ही योजना समग्र शिक्षेच्या अंतर्गत राबवली जाणार असून, त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी उशीर होणार नाही.
दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या आसपास एक गणवेश वितरित केला जातो आणि दुसऱ्या गणवेशासाठी काही महिने वाट पाहावी लागते. मात्र, यंदा हे चित्र बदलणार आहे. समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने या योजनेसाठी पुढाकार घेतला असून, पहिल्या दिवशीच दोन्ही गणवेश मिळावेत यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

दोन गणवेश संच दिले जाणार-
केंद्र सरकारने समग्र शिक्षेच्या माध्यमातून यासाठी तत्त्वतः मंजुरी दिली असून, एकूण 42,97,790 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 600 रुपये या दराने 181 कोटी 47 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, राज्य शासनाच्या योजनेंतर्गत 11,15,760 विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये प्रमाणे 66 कोटी 94 लाख 56 हजार रुपये मंजूर झाले आहेत. या दोन्ही योजनांमधून मिळणाऱ्या निधीतून पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेश संच दिले जातील.
ही योजना पहिली ते आठवीमधील अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी, मुली आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलांना लागू आहे. विशेष म्हणजे, या वर्षापासून विद्यार्थ्यांना दोन गणवेशांसह एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजेही दिले जाणार आहेत. तसेच, नव्याने पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल.
कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?
गणवेश वितरणाची पूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे असणार आहे. गणवेशाचा रंग, डिझाईन आणि खरेदी प्रक्रियेबाबतची सर्व निर्णय समितीच घेणार आहे. ज्या शाळांमध्ये स्काऊट-गाईडचा अभ्यासक्रम आहे, त्या शाळांना दुसऱ्या गणवेशाचा रंग संस्थेच्या नियमानुसार निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गणवेश वाटपाचे निरीक्षण करावे, असेही निर्देश आहेत.
तसेच, योजनेचा लाभ फक्त पात्र विद्यार्थ्यांनाच मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना आधीच दुसऱ्या शासकीय योजनांमधून गणवेश मिळालेला आहे, त्यांना योजनेचा दुबार लाभ दिला जाणार नाही. शाळांना स्थानिक निधीतून गणवेश दिला गेला असेल, तरी त्यांना पुन्हा समग्र शिक्षेअंतर्गत गणवेश देण्यात येणार नाही.
या निर्णयामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना नव्या गणवेशात शाळेत उपस्थित राहता येणार आहे. पालकांवरचा आर्थिक भार कमी होणार असून, विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सुरुवातीपासूनच एकसंधता आणि आत्मविश्वास मिळणार आहे.