बदलत्या राजकीय परिस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा, अशी आग्रही मागणी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली. गायकवाड अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
गायकवाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ६ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा आग्रह आपण धरला.
सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही मागणी उचलून धरली. या आढावा बैठकीनंतर गेल्या दोन दिवसांत घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर भाजपचे खासदार असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील तीन मतदारसंघात बदल करण्याच्या मनस्थितीत भाजप असल्याचे समोर आले आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती चांगली झाली असल्याचे पक्षाध्यक्ष अजित पवार महायुतीच्या बैठकीत निदर्शनास आणून देणार असल्याचे समजते.
गेल्या दोन वर्षांपासून नगर लोकसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांनी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील साखर सम्राटही विखेंच्या विरोधात उतरल्याचे चित्र आहे.
भाजप नगर लोकसभा मतदारसंघात खासदार विखे यांना डावलून दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.