Ahmednagar Politics : ‘अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच जोरावर आले आहे. लोकसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. १३ तारखेला मतदान होईल व हा धुराळा शांत होईल. सध्या आपापल्या उमेदवारांसाठी गावातील सरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन, गावपुढारी सक्रिय झाले आहेत.
तसेच सर्वच उमेदवार आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु सध्या अनेक लग्न सोहळे, दशक्रिया विधी, बारसे, वाढदिवस आदी कार्यक्रम करणाऱ्या हौश्यागौश्यांची संख्या वाढलीये. या लोकांना नेते मंडळी आपल्याकडे यावे व कार्यक्रमास हजेरी लावावी अशी इच्छा असते.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्रमांना न जाणे म्हणजे नाराजगी ओढवण्यासारखे आहे. त्यामुळे नेत्यांवर मोठी पंचाईत आली की प्रचार करावा की कार्यक्रम. पण आता या नेत्यांची ही बाजू त्यांच्या कारभारणींनी चांगलीच सांभाळली आहे.
एकही कार्यक्रम सोडीनात कारभारणी
उमेदवारांच्या पत्नी अर्थात कारभारणी या सध्या पायाला भिंगरी लागल्यागत पळतायेत. विवाह सोहळे असो की दशक्रिया विधी या सर्वच कार्यक्रमांना त्या हजेरी लावत आहेत. यातून त्या एकप्रकारे मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेत्यांपेक्षा लोकांना ‘ताईं’च्या अपेक्षा
सध्या राणीताई लंके व धनश्रीताई विखे या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अनेक कर्यक्रम एकाच वेळी असतील तर जे कार्यक्रम राहून गेले त्यांच्या घरी दुसऱ्यादिवशी जाऊन भेटी दिल्या जात आहेत.
यातून सदर नेत्यांविषयी आपुलकी निर्माण होत आहे. राणीताई लंकेंच्या पायाला भिंगरी तर धनश्रीताईही आघाडीवर असे चित्र सध्या या भेटीगाठींबाबत दिसत आहे. विशेष म्हणजे हे नेते प्रचारात व्यस्त असल्याने ते नाही आले तरी लोक ते एक्सेप्ट करत आहेत, नेते नाही तर नाही पण ताई हव्यात अशी अपेक्षा आता लोकांना लागली आहे.
कारभारणींच्या भेटीगाठी राजकीय गणिते बदलवतायेत
सध्या या दोन्ही ताईंच्या भेटीगाठी राजकीय गणिते बदलवत आहेत. लोकांना आता नेत्यांविषयी , त्या कुटुंबाविषयी अभिमान वाटत आहेत. ताई कधी आल्या, किती वेळ आमच्या कुटुंबासाठी दिला, या ताईंपेक्षा त्या ताई कशा जास्त वेळ देतात अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. म्हणजेच कारभारणींच्या भेटीगाठी राजकीय गणिते बदलवतायेत असे हे चित्र आहे.