Ahmednagar Politics : भारतात लवकरच लोकशाहीचे महाकुंभ सजणार आहे. अर्थातच देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. राजकीय पक्षांनी देखील आता जय्यत तयारी सुरू केली आहे.
राजकीय नेते देखील आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच तयारी देखील सुरू केली आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगर दक्षिण मध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
खरेतर अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. एक शिर्डी लोकसभा आणि दुसरा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर महायुतीकडून भाजपाचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे.
मात्र, या जागेवरून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे उभे राहतील की दुसरा कोणी उमेदवार उभे राहणार याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि, डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा एकदा या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
दुसरीकडे महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे अजितदादा यांची साथ सोडून आगामी निवडणुकीसाठी निलेश लंके शरद पवार यांच्या गटात परत जाणार अशा चर्चा आहेत.
अर्थातच आगामी लोकसभेसाठी अजितदादा यांच्या गटातील निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या गटाच्या तुतारी या चिन्हावर उभे राहणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे या चर्चांना तेव्हा अधिक उधाण आले जेव्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अमोल कोल्हे यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ नगरमधून लोकनेत्यांनी वाजवावी, असे विधान करत आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.
आता यावर नगर दक्षिणचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खोचक टिप्पणी केली आहे. याबाबत बोलताना खासदार महोदय यांनी म्हटले की, “कोणाला तुतारी वाजवायची, कोणाला बॅण्ड वाजवायचा, कोणाला ढोल वाजवायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
मला त्याच्यात रस नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीकडून भाजप जो उमेदवार देईल, त्याचे काम करणार आहोत. हे काम प्रामाणिक आणि चांगले असणार आहे.
” तुतारीबाबत अगोदरच बोललो होतो. हवा तर फुंकली जाईल. पण आवाज निघतो का माहीत नाही. येणाऱ्या कालावधीत तुम्हाला कळेल,’ असे देखील खासदार विखे यांनी यावेळी म्हटले आहे.