Ahmednagar Politics : लोकसभेचे मतदान तोंडावर आले आहे. अहमदनगर व शिर्डीसाठी १३ मे ला मतदान होणार असून प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. परंतु काळाच्या ओघात व परिस्थितीनुसार प्रचाराच्या साधनात व पद्धतीतही बदल होताना दिसत आहे.
दरम्यान उष्णतेचा पारा जवळपास ४१ अंशावर गेल्याने उन्हाच्या तडाख्याने प्रचार करण्यात अडचण येत असल्याचे दिसत आहे. शिर्डी मतदारसंघातील दोन्हीही प्रमुख उमेदवारांना उन्हाच्या तडाख्याने प्रचार करण्यात अडचण येत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रचारावर सर्वच उमेदवारांनी मोठी भिस्त ठेवत सोशल मीडियावर प्रचाराला पसंती दिली आहे.
शिर्डी मतदार संघामध्ये शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभे आहेत. तसेच शिवसेनेचे कार्यकर्त्यांचे देखील विभाजन झाले. नेवासे तालुक्यामध्ये दोन्हीही प्रमुख उमेदवारांच्या एक, दोन फेऱ्या झालेल्या आहेत. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे नेवासे तालुक्यांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची विभाजन झाल्यामुळे कार्यकर्त्यांची कमतरता आहे.
निवडणुकीला एक महिना राहिला असताना प्रचाराने वेग घेणे अपेक्षित आहे. परंतु उन्हाचा तडाखा या प्रचारांमध्ये मोठी अडचण ठरणार आहे. नेवासे तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचे वारे अजून संचारलेले दिसत नाही. या परिस्थितीमध्ये प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागणार आहे.
आपला प्रचार व मतदान वाढावे यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना त्यावरील आरोप-प्रत्यारोप हा देखील प्रचाराचा मोठा भाग झाला. निवडणुकांमध्ये यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भांडणे झालेल्या घटना नेवासे तालुक्यात घडलेल्या आहेत. सोशल मीडियाच्या वापराचे अपरिहार्यतेमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला.
तालुक्यातील काही तरुणांना उमेदवाराकडून ऑफर देखील देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियावरील प्रचारामुळे मतदार संघातील मतदारांपर्यंत पोहोचता येतेच. पण त्याचबरोबर मतदार संघाबाहेर नोकरी, कामधंदा, व्यवसायनिमित्त बाहेर गेलेल्या मतदारांचा संपर्क साधता येतो.
दरम्यान, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगही विविध माध्यमातून जनजागृती करताना दिसत आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेल्या मतदानाच्या गावांत लोकगिताच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन कलाकारांकडून करण्यात येत आहे. या मतदान जनजागृती अभियानाला प्रतिसादही मिळत आहे.
उमेदवार व समर्थकांचे अनेक ग्रुप
सोशल मीडियावर प्रचारासाठी विशेष महत्त्व देत असताना तालुका पातळीवर उमेदवार व त्यांचे समर्थकांचे अनेक ग्रूप नव्याने तयार झाले आहेत. त्याच्या माध्यमातून बाहेरच्या मतदारांना मतदानासाठी येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.