Ahmednagar Politics : शिर्डीत पुन्हा ट्विस्ट ! लोखंडे-वाकचौरे-विखे-रूपवतेंच्या आखाड्यात आता मनोज जरांगे पाटलांची एंट्री होणार? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar Politics : लोकसभेच्या रणधुमाळीत आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय डावपेचांना उधाण आले आहे.

आज (सोमवारी) निवडणुकीच्या आखाड्यात किती उमेदवार राहतील, कसे गाजेल मैदान याचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान आता मागील काही दिवसांपासून शिर्डीचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. याचे कारण म्हणजे त्यात येणारे ट्विस्ट. सुरवातीला लोखंडे – वाकचौरे अशी लढत होईल असे वाटत असतानाच नाराज झालेल्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला.

त्यामुळे दोन्ही मातब्बर नेत्यांना याची धडकी भरली. दरम्यान त्यानंतर रुपवते यांनी आपल्या वेगवेगळ्या कृतीतून सर्वानाच अचंबित करत संभ्रमात ठेवले आहे. आ. सत्यजित तांबे यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेणार असे त्यांनी सुरवातीला वक्तव्य केले होते.

आता मात्र त्यांनी केलेल्या एका कृतीने त्यांनी आता नवा डावपेच टाकला का अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुपवते-जरांगे पाटील भेट महत्त्वाची
उत्कर्षा रुपवते यांनी मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे जात भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. त्यांना साईबाबांची प्रतिमा भेट देत सन्मान केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुपवते-जरांगे पाटील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटी दरम्यान उत्कर्षा रूपवते या जरांगे पाटलांना म्हणाल्या की, दादा तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा असे म्हणत त्यांनी याबाबतची माहिती समाज माध्यमावर टाकली. यात त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, गरजू मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी ऐतिहासिक लढा देणारे लढवय्ये मनोज दादा जरांगे-पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

काल (२८ एप्रिल २०२४) संभाजीनगर येथे त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून आशीर्वाद घेतले असे त्यांनी यात म्हटले आहे. तुमच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

शिर्डीत जरांगे पाटील एंट्री करणार?
या भेटीमुळे मनोज जरांगे पाटील शिर्डीत येणार का? की त्यांचा फॅक्टर, त्यांचे नाव शिर्डीच्या राजकारणात एंट्री करणार का? अशा विविध खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe