Loksabha Elections : जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ? जागा सेना राष्ट्रवादीची पण उमेदवार भाजपचे

Sonali Shelar
Published:
Loksabha Elections

Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीतील शिवसेनेने किमान १३, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १० मतदारसंघांसाठी आग्रह धरल्याने भाजपने मित्रपक्षांना नवा प्रस्ताव दिला आहे. ‘जागा तुमची, पण उमेदवार किंवा चिन्ह आमचे’ असा हा भाजपचा प्रस्ताव आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील दोन्ही पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पूर्वीच्या पक्षाने लढवलेल्या जागा आपल्याला मिळाव्यात यावर ठाम आहेत. परंतु, विद्यमान अनेक खासदारांच्या जागा धोक्यात असल्याचे भाजपने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

त्यामुळे, भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही. पण, मित्रपक्षही गमवायचे नाहीत, त्यांना दुखवायचे नाही, म्हणून त्यांनी अखेर शिवसेनेच्या शहरी भागातील खासदारांना कमळ चिन्हावर लढवण्याची तर काही ठिकाणी ‘आम्ही सांगू तो तुमचा उमेदवार’ अशी शक्कल लढवली आहे.

महायुतीच्या जागावाटपासंदर्भात दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित नेत्यांशी चर्चा केली. ‘जिंकण्याची क्षमता’ हा एकमेव निकष ठेवून जागावाटप केले जाईल. त्यामुळे अवास्तव मागणी न करता व्यवहार्य तोडगा काढा, अशी सूचना त्यांनी केली होती.

महायुतीत शिवसेना किमान १३ जागांसाठी, तर राष्ट्रवादी किमान १० जागांसाठी आग्रही आहे. २०१४ किंवा २०१९ इतकी यंदा अनुकूल परिस्थिती नसल्याचे सर्वेक्षणातून लक्षात आल्याने भाजप ताकही फुंकून पीत आहे.

जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार बदलण्यासोबतच काही प्रयोग भाजप करू इच्छित आहे. भाजप स्वतःच्याही अनेक विद्यमान खासदारांना घरी बसवणार आहे. बड्या नेत्यांना आणि नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवणार आहे.

मित्रपक्षांच्या उमेदवारांबाबत नकारात्मक प्रतिमा बनल्याने त्याचा फटका लोकसभेच्या यशाला बसू शकतो, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील कमीत कमी ३४ जागा, तर जास्तीत जास्त ३६ जागा लढवण्याची तयारी केली आहे.

मात्र, शिवसेनेतील १३ खासदार माझ्या विश्वासावर सोबत आले आहेत. त्यांची तिकिटे कापता येणार नाहीत, असे शिंदे यांनीही भाजपच्या नेतृत्वाला सांगितले आहे. राष्ट्रवादीनेही लोकसभेसाठी दुहेरी आकड्यातील जागांची मागणी केली आहे.

मात्र, त्यांची मर्यादित ताकद लक्षात घेऊन भाजपने त्यांना ४ ते ५ जागा देण्याची तयारी केली आहे. त्यांनी मात्र अनुक्रमे किमान १३ आणि ९ जागांची आग्रही मागणी कायम ठेवली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाजपने या दोन्ही पक्षांना ‘जागा तुमची; पण चिन्ह किंवा उमेदवार आमचा’ असा एक प्रस्ताव दिला असल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe