Lok Sabha Election 2024:- सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सगळीकडे निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. देशामध्ये जवळपास सात टप्प्यात व महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून संपूर्ण देशामध्ये जवळपास 543 जागांवर हे मतदान होणार आहे.
या निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलला असून शेवटच्या टप्प्यातील मतदान एक जूनला पार पडेल व चार जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. लोकसभेची ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी याकरिता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे नियम घालून देण्यात आलेले असून काही उपाययोजना देखील करण्यात आलेला आहे.
निवडणुकांच्या बाबतीत बघितले तर अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा देशाच्या लोकसभेची त्यामध्ये प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या भेटवस्तू किंवा मतदारांना पैशांचे वाटप केले जाते.
त्यामुळे निवडणूक या पारदर्शक व्हाव्यात या तत्त्वालाच तिलांजली फासली जाते. तसेच अनेक गुन्हेगारी कृत्य, पैशांचा अनैतिकपणे वापर किंवा अफवा इत्यादी बाबी या कालावधीत घडण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणुका पारदर्शक व्हाव्यात व चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवता यावे याकरिता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून cVIGIL App लाँच करण्यात आलेले
असून या निवडणूक कालावधीमध्ये कुठे गैरप्रकार घडत असेल किंवा आचारसंहितेचा भंग होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणाचा किंवा त्या गैर कृत्याचा फोटो काढून या ॲपवर अपलोड करू शकणार आहेत.
तसेच निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर उमेदवाराच्या माध्यमातून पैशांचे वाटप केले जात असेल किंवा काही भेटवस्तू मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटल्या जात असतील तर तुम्ही याची तक्रार देखील एप्लीकेशन वर करू शकणार आहेत.
कसे आहे cVIGIL एप्लीकेशनचे स्वरूप?
हे एक मोबाईल ॲप्लिकेशन असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे व मतदार तसेच नागरिकांना निवडणूक कालावधीमध्ये जर आचारसंहितेचा भंग अशा पद्धतीच्या काही घटना घडत असतील किंवा तक्रारी असतील तर त्यांची नोंद करू शकणार आहेत.
आचारसंहिता भंग याच्यामध्ये लाच देणे किंवा मोफत वस्तू देणे, या कालावधीत दारूची विक्री करणे किंवा परवानगी पेक्षा जास्त वेळ लाऊड स्पीकर वाजवणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. अशा गोष्टी जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या परिसरामध्ये घडत असतील तर तुम्ही पुरावा म्हणून
त्या गोष्टींचा फोटो किंवा व्हिडिओ बनवून या एप्लीकेशन वर तुम्ही अपलोड करू शकणार आहात. या पद्धतीची तक्रार निवडणूक आयोगाला मिळताच शंभर मिनिटांच्या आतमध्ये लोकेशन ट्रेस करून निवडणूक आयोगाची टीम त्या जागेवर पोहोचेल.
कशा पद्धतीने पार पडेल ही प्रक्रिया?
या एप्लीकेशनच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने तक्रार नोंदवल्यानंतर त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षापर्यंत लागलीच पोहोचते आणि त्यानंतर एका फिल्ड युनिटला नियुक्त केले जाते. ही पथके लोकेशनवर नेविगेट करण्याकरिता आणि कारवाई करण्यासाठी cVIGIL Investigator नावाचा मोबाईल एप्लीकेशन वापरतात.
तक्रारीला प्रतिसाद दिल्यानंतर या ॲप्लिकेशनच्या द्वारे रिटर्निंग ऑफिसरला फील्ड रिपोर्ट पाठवला जातो व तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ती तक्रार निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर पाठवली जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येते.
त्यामुळे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी बऱ्याच अंशी मदत होईल हे मात्र निश्चित. परंतु नागरिकांनी देखील याबाबतीत सजग व सावध राहून नागरिक म्हणून काही जबाबदाऱ्या पार पाडणे देखील गरजेचे आहे.