Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. ठाकरे गटाने या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. शिंदे गटाने या जागेवरून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मात्र, शिर्डीच्या जागेवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यासाठी त्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा केला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाने आठवले यांना तिकीट दिले नाही.
महायुतीने ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिली आहे. यामुळे मात्र रामदास आठवले यांचे समर्थक आणि त्यांच्या रिपाई पक्षाचे कार्यकर्ते मोठे नाराज झाले आहेत. खरेतर रिपाईने शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची मागणी केली होती.
मात्र यापैकी एकाही जागेवर रिपाईला संधी देण्यात आली नाही. यामुळे रिपाईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि आठवले समर्थकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. या नाराजीचे पडसाद नगर शहरात झालेल्या पक्षाच्या निर्धार बैठकीत उमटलेत. या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आवळला.
तसेच जोपर्यंत महायुतीकडून रिपाईला सत्तेत वाटा देण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचे काम करणार नाहीत निवडणुकीत तटस्थ राहतील असा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तसेच नगर व शिर्डीमध्ये उमेदवारी करण्यासाठी जिल्हाव्यापी दौरे व मेळावे करण्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये ठिणगी पडली असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तथा कार्यकर्त्यांना महायुतीच्या कोणत्याही बैठकीला अथवा मेळाव्याला हजेरी लावू नये असे आवाहन केले आहे. तसेच ही आपल्या अस्तित्वाची लढाई असून नगर व शिर्डीत उमेदवाराशी कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ते म्हटलेत की, रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली गेली, आमच्या पक्षाला एकही जागा दिली गेली नाही, हा आंबेडकर चळवळीचा अपमान आहे. निवडणुकीत पक्षाला डावलले गेल्याने पक्ष कार्यकर्त्यांच्या मनाला ठेच लागली आहे.
म्हणून कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात बंडाच्या तयारीत आहेत अन याची ठिणगी नगरमध्ये पडणार आहे. यामुळे आता रिपाईचे हे बंड उठावात परावर्तित होणार की महायुतीकडून यावर काही तोडगा काढला जाणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.
मात्र जर रिपाईने महायुतीसाठी काम केले नाही तर दलित मत वंचितकडे आणि महाविकास आघाडीकडे शिफ्ट होऊ शकतात. साहजिकच याचा मोठा फटका महायुतीला सहन करावा लागणार आहे. यामुळे आता रिपाईच्या या मागणीवर महायुती काय निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.