Shirdi News : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे हळूहळू जाहीर केली जात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर या जागेवर महायुतीमधून भाजपाने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या जागेवरून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी बहाल केली आहे.
पण, महाविकास आघाडी कडून या जागेवर अजूनही अधिकृतरित्या उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे शिर्डीच्या जागेवरून महाविकास आघाडीकडून युबीटी शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे.
मात्र या जागेवरून अजून महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. पण ही जागा महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊ शकते. मध्यंतरी शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत असल्याने भाजपा या जागेवर आपला उमेदवार उतरवणार असा चर्चा होत्या.
नंतर या जागेवर महायुतीमध्ये मनसे समाविष्ट झाल्यास ही जागा मनसेला मिळणार अशा देखील चर्चा होत्या. एवढेच नाही तर रामदास आठवले देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र या साऱ्या घडामोडीनंतर आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मोठा दावा केला आहे.
खासदार महोदय यांनी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी माझी उमेदवारी 100% नक्की असल्याचे म्हटले. एवढेच नाही तर या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत चर्चा झाली असल्याचा देखील त्यांनी दावा केला आहे.
खासदार महोदय यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले आहे. त्यावेळी त्यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. ते म्हटलेत की, यापूर्वी माझे स्टिंग आॅपरेशन झाले. त्यात मी दहा कोटी रुपये नाकारले.
मात्र त्यांनी साई संस्थानच्या तूप खरेदीत दहा लाख रुपये खाल्ले, अशा शब्दात भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर हल्ला चढवला. उमेदवारी संदर्भात पुढे बोलताना त्यांनी असे म्हटले की ‘मी पैलवान आहे. दररोज 6 किलोमीटर चालतो. त्यांची तयारी असेल, तर मी कुस्ती खेळायला तयार आहे.
श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे पक्षात आलेत, पण मुख्यमंत्री यांनी त्यांना पुढे पाहू असे आश्वासन दिलेले आहे. त्यांच्या प्रवेशाचा आणि लोकसभा उमेदवारीचा संबंध नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
यामुळे आता शिर्डीच्या जागेवरून महायुतीकडून नेमकं कोण उभे राहणार ? विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना खरंच या जागेवरून पुन्हा उमेदवारी मिळणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.