Shirdi Loksabha : भारतीय जनता पक्षाने शिर्डीतून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार देण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे. निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध कार्यकर्ते काम करतील एवढी तीव्र भावना आहे, असेही रिपाइंच्या प्रमुखांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत रिपाइं नेते विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड यांनी ही माहिती दिली. यावेळी भीमराज बागूल, आशिष शेळके, सुभाष त्रिभुवन, आबासाहेब रणनवरे, सुनील शिरसाठ, अनिल रणनवरे, रमादेवी धीवर, राजूनाना गायकवाड, आदी उपस्थित होते.
वाकचौरे म्हणाले, रिपाइं हा भाजपचा खूप जुना मित्र पक्ष आहे. नव्याने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातात. मात्र, रिपाइंने कठीण काळात साथ देऊनही भाजपकडून डावलले जाते.
लोकसभेसाठी शिर्डी व सोलापूर या दोन जागा रिपाइंला द्याव्यात. या दोन जागांच्या बदल्यात महायुतीला सर्व जागांवर विजयी करण्याची ताकद रिपाइंमध्ये आहे. वंचितने मिळालेल्या मतांच्या बळावर महाआघाडीकडून पाच ते सात जागांवर दावा केला आहे. रिपाइंने मात्र स्वतंत्रपणे निवडणूक न लढवता भाजपला साथ केली.
भाजपने त्यांच्या कोट्यातून शिर्डी व सोलापूरची जागा रिपाइंला द्यावी. कोपरगावमध्ये काळे व कोल्हे, शिर्डीतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आठवले यांच्यासाठी गणित जुळवून आणतील. मात्र, डावलले गेले तर शिर्डी व नगर दक्षिणेतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा यावेळी विजय वाकचौरे यांनी दिला.