Agniveer Yojana : केंद्र सरकारने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हा नवा निर्णय भारतीय लष्करातील जवानांसाठी अधिक महत्त्वाचा राहणार आहे. खरेतर सरकारने 3 वर्षांपुर्वी अग्निवीर योजना सुरू केली. याअंतर्गत 4 वर्षासाठी सैन्यात भरती केली जाते. दरम्यान 2022 मध्ये भरती करण्यात आलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीची चार वर्षांची सेवा येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. यामुळे आता पहिल्या तुकडीतील देशभरातील हजारो अग्निवीरांच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
पण , यातील काही जवान कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार आहेत. दरम्यान भारतीय लष्कराने कायमस्वरूपी सैनिक निवडीसंदर्भात काही नवीन सूचना जारी केल्या आहेत. लष्कराने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की अग्निवीरांमधून कायमस्वरूपी सैनिकांची निवड करताना शिस्त, नियमांचे पालन आणि सेवा कालावधीतील वर्तनाला अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. विशेषतः लग्नासंदर्भातील नियमांबाबत लष्कराने कठोर भूमिका घेतली आहे.

लष्कराच्या नियमांनुसार, अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षांच्या सेवा कालावधीत लग्न करण्यास मनाई आहे. तसेच, चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतरही, कायमस्वरूपी सैनिक म्हणून निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत अग्निवीरांनी अविवाहित राहणे बंधनकारक असेल.
लष्कराच्या माहितीनुसार, जून आणि जुलै महिन्यात सुमारे 20 हजारांहून अधिक अग्निवीरांची सेवा संपणार आहे. यापैकी सुमारे 25 टक्के अग्निवीरांना त्यांच्या कामगिरी, लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती आणि एकूण शिस्त यांच्या आधारे कायमस्वरूपी सैनिक म्हणून पुन्हा सैन्यात सामील करून घेतले जाणार आहे. मात्र, या कालावधीत लग्न केल्याचे आढळून आल्यास संबंधित अग्निवीर कायमस्वरूपी सेवेपासून थेट अपात्र ठरणार असल्याचा इशाराही लष्कराने दिला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की अग्निवीरांची साधारणतः 21 व्या वर्षी भरती करण्यात येते आणि 25 व्या वर्षी त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपतो. त्यानंतर कायमस्वरूपी सैनिक निवडीची प्रक्रिया पूर्ण होते. परंतु चार वर्षांचे सेवा समाप्त झाल्यानंतर कायमस्वरूपी सैनिक म्हणून निवडक करण्यापर्यंत अतिरिक्त चार ते सहा महिन्यांचा अगदी लागतो. दरम्यान या संपूर्ण कालावधीत अग्निवीरांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
केवळ पात्र, शिस्तबद्ध आणि नियमांचे पालन करणारे अग्निवीरच कायमस्वरूपी कमिशनसाठी पात्र ठरणार आहेत. चांगला सेवा रेकॉर्ड, उत्कृष्ट कामगिरी आणि अविवाहित स्थिती ही कायमस्वरूपी सैनिक निवडीसाठी अनिवार्य अट असल्याचे लष्कराने यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे अग्निवीरांनी भविष्यातील संधी लक्षात घेऊन अत्यंत जबाबदारीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.












