Ahmednagar Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार हे मंगळवारी (दि.२) जानेवारी २०२४ रोजी आश्वी (ता. संगमनेर) येथे रिपाईचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या गौरव सोहळ्यासाठी येणार आहे. त्यामुळे तब्बल चाळीस वर्षानंतर आश्वीला त्यांची दुसरी भेट ठरणार आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी चाळीस वर्षापूर्वी आश्वी गावाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांची सजवलेल्या बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढल्याची आठवण जुन्या ज्येष्ठ नागरिकांनी याप्रसंगी सांगितली. याआधी जिल्ह्याबाहेरील अनेक दिग्गज नेत्यांनी आश्वी येथे हजेरी लावली होती.
यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील, विधासभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकारी मंत्री विजयसिंह मोहिते, मंत्री छगन भुजबळ, महादेव जाणकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदींनी भेटी दिल्या आहेत.
दरम्यान, खा. पवार यांचे बालपण हे शिक्षणानिमित्त लोणी व परिसरात गेले आहे. त्यामुळे या परिसराची राजकीय, सामाजिक व आर्थिक नाडीबरोबरचं चौफेर खडानखडा माहिती पवार चांगलेच जाणुन आहेत.
या कार्यक्रमानिमित्त खा. शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात तसेच रिपाईचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले,राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आ. रोहीत पवार आदी उपस्थित राहणार आहे.
याशिवाय महाविकास आघाडीतील इतर दिग्गज नेते देखील या व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खा. शरद पवार हे यावेळी आपल्या भाषणात काय वक्तव्य करणार? याकडे लक्ष्य लागले आहे.