Ahmednagar News : चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याची झडप, शेतात ओढत नेले..लचके तोडले.. सलग दोन घटनांमुळे नागरिकांत दहशत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात बिबट्याची दहशत चांगलीच पसरली आहे. लोणी शिवारात लहान मुलाला बिबट्याने ठार मारल्याची घटना ताजी असतानाच आता लोणीपासून तीन किलोमीटर अंतरावरील सादतपूर शिवारात भरदुपारी चार वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

हर्षल राहुल गोरे असे या चिमुरड्याचे नाव आहे. नरभक्षी बिबट्यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली आहे. सलग दोन घटनांमुळे ग्रामस्थही संतप्त झाले आहेत.

१४ जानेवारी रोजी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अथर्व लहामगे या नऊ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वन विभागाची टीम लोणी परिसरात ठाण मांडून असताना त्यांना एवढ्या दिवसात नरभक्षक बिबट्या जेरबंद करता आला नाही.

गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास लोणी गावापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावरील संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात राहुल मच्छिंद्र गोरे यांचा चार वर्षांचा मुलगा आपल्या चुलत भावासोबत आपल्या घराकडून चुलत्यांच्या घराकडे जात होता.

गुरुवारी बिबट्याच्या रुपाने काळाने घाला घातला आणि हर्षलला मृत्यूने कवटाळले. गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षलवर हल्ला करून मकाच्या शेतात ओढून नेले. त्याच्यासोबत असलेला मुलगा घाबरून गेला. तो ओरडतच घराकडे पळाला.

आजूबाजूच्या लोकांना लवकर काय घडले हे समजू शकले नाही. मात्र मेंढपाळ आणि गोरे कुटुंबातील लोकांनी धाडस करून मकाच्या शेतात धाव घेतली. लोकांना बघून बिबट्या निघून गेला, परंतु तोपर्यंत हर्षलची दुरवस्था झाली होती.

हर्षलला लोणीच्या प्रवरा रुग्णालयात आणण्यात आले. पण काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. हर्षल एकुलता एक मुलगा होता. त्याला दीड वर्षांची एक बहीण आहे. सध्या गावातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

बिबट्याचा हौदोस
लोणी परिसरात अनेक घटना घडल्या आहेत. वन विभागाची फक्त पळापळ सुरू असल्याचे चित्र आहे. बळीनारायण रस्त्यावर अथर्व मेहेत्रे हा युवक बिबट्या बघून बेशुद्ध पडला. प्रवरानगर रस्त्यावरील प्रभाकर विखे आणि अशोक वलवे यांच्या शेतात भरदिवसा दोन बिबट्यांची झुंज झाली.

याच भागात एका घोड्यावर हल्ला करून बिबट्याने ठार केले. दाढ रस्त्यावर बिबट्याची धडक बसून दुचाकीवरून जाणारा तरुण गंभीर जखमी झाला. अशा अनेक घटना अलीकडील काही दिवसात घडल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe