Ahmednagar News :- मागील चार वर्षात निवडणुकीत जे जे आश्वासन दिले ते ते पूर्णत्वाकडे नेले असून केवळ भूमिपूजन न करता त्या-त्या कामाचे उद्घाटन करणारा खासदार मी आहे असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
नगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित भाजप बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विखे म्हणाले की, येत्या ३१ ऑगस्ट रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहणार असून या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील केंद्र सरकारशी संबंधित मागण्यांबाबत आपण त्यांच्याकडे मागणी करणार आहे.
मला खात्री आहे की ते आपल्या सर्व मागण्या मान्य करतील, याबरोबरच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडूनही काही तरी जास्तीचे आपल्याला मिळेल असा विश्वास आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश चंद्रावर गेला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कालच चांद्रयान ३ ही मोठी आणि महत्वाची मोहीम यशस्वी झाली आहे.
या मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञ तसेच इस्रोमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे आपण सर्वजण मिळून अभिनंदन करूयात. देश आज विकासाच्या दिशेने जात असून आपला जिल्हा देखील आता विकासाच्या धारेत येत आहे.
लोकसभा निवडणुकीत जे जे नगरकरांना आपण आश्वासन दिले ते ते आपण पूर्ण करत आहोत. यात प्रामुख्याने उड्डाणपूल, बायपास, राष्ट्रीय महामार्ग, अमृत पाणी पुरवठा योजना, वयोश्री, दिव्यांगासाठी सहाय्यक साधन वाटप, यासारखे महत्वाची कामे पूर्ण केली आहेत.
याशिवाय जिल्ह्यात विविध विकास योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आणला आहे. मी असा खासदार आहे ज्याने की भूमिपूजन पण केले आणि लोकार्पण देखील माझ्याच खासदारकीत केल्याचे ते म्हणाले. या बैठकीस भाजपचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती