Ahmednagar Politics : विधानसभेसाठी दिग्गजांच्या ‘कारभारणी’ सरसावल्या ! हळदी कुंकवाच्या निमित्ताने निवडणुकांची पायाभरणी

Ahmednagarlive24
Published:

मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणूक झालेल्या नाहीत. यात स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश आहे. यामुळे अनेक राजकीय नेते केवळ वेट अँड वॉच करत होते. परंतु आता आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्यानंतर लगेच विधानसभा लागतील व इतर निवडणुकाही. त्यामुळे यंदाचे हे वर्ष निवडणुकांचेच वर्ष असणार आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गज निवडणुकांच्या तयारीला लागले आहे.

वेध विधानसभेचे

विधानसभा निवडणुकीला आता केवळ काही महिनेच उरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता अनेकांना विधानसभेचे वेध लागले आहेत. श्रीगोंदे सारखे असे मतदार संघ आहेत की जेथे विधानसभेसाठी डझनावारी उमेदवार इच्छुक आहेत. त्यादृष्टीने सर्वांचीच तयारी सुरु आहे.

कारभारणी सरसावल्या

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे निमित्त साधत उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आता नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीचा ‘मुहूर्त’ साधत गावोगावी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

लोकसभा निवडणुक झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने तालुक्यातील इच्छुक मंडळी जनसंपर्क वाढविण्यासाठी कामाला लागले आहेत. सार्वजनिक, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतानाच व्यक्तिगत गाठीभेटी घ्यायला नेत्यांनी सुरुवात केली आहे.

गावोगावी हळदी कुंकवाचे कार्यक्रम

जनसंपर्क मोहिमेत त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी आहे. नेत्यांच्या ‘कारभारणी’ मकर संक्रांतीचा मुहतं साधून गावोगावी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करीत महिला मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. यामध्ये जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे आणि संचालिका डॉ. प्रणोती जगताप यांनी आघाडी घेतली आहे.

निवडणुकांची पायाभरणी

अनुराधा नागवडे स्वतः विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, तर डॉ. प्रणोती जगताप या पती माजी आ. राहुल जगताप यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रतिभा पाचपुते, भाजपच्या सुवणां पाचपुते, मनीषा शेलार याही सार्वजनिक, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावून जनसंपर्क वाढवत आहेत. हळदी कुंकवाच्या निमित्ताने निवडणुकांची पायाभरणी सध्या होत आहे.

मिशन इलेक्शन

फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. विधानसभा निवडणूक देखील आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा लढविण्यासाठी प्रमुख इच्छुकांनी ‘मिशन इलेक्शन’ सुरु केल्याचे चित्र दिसत आहे. मध्यंतरी स्लिप मोडवर गेलेले नेते आता पुन्हा एकदा जनसामान्यांच्या संपर्कात येऊ लागले आहेत. त्यामुळे आता आगामी वर्षभर तरी संपूर्ण जिल्ह्याभर विविध राजकीय कार्यक्रमांची रेलचेल दिसले यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe