अहमदनगरच्या राजकारणात मोठा भूकंप ? निवडणुकांपूर्वी राजकारणात होणार मोठी उलथापालथ

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Politics News : लोकसभेची निवडणूक बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राजकीय उलथापालथ सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. विशेषतः अहमदनगर जिल्ह्यात राजकीय समीकरणे मोठ्या जलद गतीने बदलू लागली आहेत.

अशातच आता नगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नगर शहरात पुन्हा एकदा कोतकर गट सक्रिय झाला आहे. नगर दक्षिणेचे भाजपा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समवेत संदीप कोतकर यांचा फोटो झळकला आहे. यामुळे आता नगरच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कोतकर गट पुन्हा एकदा शहरातील राजकारणात सक्रिय झाला असल्याने निवडणुकीच्या पूर्वीच राजकीय उलथापालथ होणार असल्याचे बोलले जात आहे.

खरे तर अशोक लांडे खून प्रकरणात आणि केडगाव मधील दुहेरी हत्याकांडाच्या आरोपामुळे कोतकर गट राजकारणापासून दूर गेल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आता त्यांचे समर्थक शक्ती प्रदर्शन करत आहेत. यामुळे कोतकर गट पुन्हा एकदा शहरातील राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खासदार सुजय विखे यांच्यासोबत संदीप कोतकर यांचा फोटो झळकला आहे. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधान आले आहे. वास्तविक कोतकर गट हा मूळचा काँग्रेसमधला. भानुदास कोतकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. भानुदास कोतकर यांनी सक्रिय राजकारणात नेहमीच किंगमेकरची भूमिका निभावली आहे. दरम्यान भानुदास कोतकर यांचे चिरंजीव संदीप कोतकर पुढे महापौर झाले.

विशेष म्हणजे महापौर झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केलीत. यामुळे शहरात कोतकर गटाचा दबदबा वाढला. मात्र यानंतर कोतकर यांच्यावर अशोक लांडे खुनाचा आरोप लावण्यात आला. नंतर केडगाव महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा खून झाला होता, याचा देखील आरोप कोतकर यांच्यावर लागला.

दरम्यान या दोन्ही आरोपांमुळे त्यांना न्यायालयाने जिल्हा बंदी लागू केली आहे. दरम्यान संदीप कोतकर हे पुण्यात व्यवसाय करत असले तरी देखील राजकारणात पडद्यामागून सूत्र हलवतात. दुसरीकडे संदीप यांचे भाऊ सचिन नगर शहरात व्यवसायाच्या निमित्ताने आजही सक्रिय आहेत. महापालिकेच्या मागील निवडणुकीत कोतकर गटाने काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. आता ते भाजप बरोबर आहेत. माजी आमदार अरुण जगताप आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासोबत त्यांचे सगेसोयऱ्याचे संबंध आहेत. म्हणजेच कोतकर गटाची नगर शहरातील राजकारणात महत्त्वाची भूमिका आहे.

खरेतर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कोतकर गट पुन्हा एकदा सक्रिय होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर कोतकर यांच्या समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी चाचपणी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकांसाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी गोळा बेरीज म्हणून हे शक्तिप्रदर्शन होत आहे. एकंदरीत कोतकर गट पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत असल्याने आगामी निवडणुका आणखी रंगतदार होणार हे जवळपास नक्की झाले आहे. तथापि कोतकर यांचा गट सक्रिय झाला असल्याने याचा भाजपाला फायदा होतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe