२४ जानेवारी २०२५ मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे, परंतु सीसीटीव्हीमध्ये दिसलेला हल्लेखोर व प्रत्यक्षात अटक करण्यात आलेली व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही,असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा,अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच या हल्ला प्रकरणात भाजपकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, जिथे सेलिब्रेटी आणि गावातील सरपंच सुरक्षित नाहीत, तिथे राज्यातील सर्वसामान्य जनता कशी काय सुरक्षित राहील ? सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सैफवरील हल्ला हा हिंदू-मुस्लिम नसून तो सुरक्षेचा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, परंतु सत्ताधारी भाजपमधील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात आली होती, परंतु आजपर्यंत सीबीआयने अहवाल दिला नाही.भाजप सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही,असेच म्हणावे लागेल.कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजप धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,असे पटोले म्हणाले.