मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. लाखोंचा जनसमुदाय घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले आहेत. समाजामधील अनेक स्तरांमधून अनेकांचा पाठिंबा आरक्षणाच्या लढ्याला मिळत आहे.
आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तीन दिवसाचे आयोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी घेतलेला आहे.
आरक्षणाच्या व आंदोलनांसाठीही इंदुरीकर महाराज यांनी याआधीही पाठिंबा दर्शवलेला आहेच. या आधी देखील त्यांनी राज्यभरात आयोजित पाच दिवसाचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले असता तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.
विविध ठिकाणावरून पाठिंबा
मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विविध ठिकाणावरून पाठिंबा मिळत आहे. मराठा आंदोलनास चित्रपट कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. आता किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पाठिंबा दर्शवला असल्याने त्यांचे २६, २७ आणि २८ जानेवारी रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले गेले आहेत.
सरकारकडून बऱ्याचशा मागण्या मान्य, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष
मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. दरम्यान काही गोष्टींच्या अध्यादेश काढण्याबाबत जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची मागणी व त्या बाबतचा अध्यादेश उद्या पर्यंत काढण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसे झाले नाही तर उद्या मुंबईत येऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.