Maratha Reservation : नगर शासनाच्या आदेशानुसार नगर महापालिकेकडून जन्म व मृत्यू नोंदीच्या आधारावर कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्यासाठी आरोग्य विभागाकडून १९०३ ते १९२७ या काळातील मोडी लिपीतील नोंदींची तपासणी केली जात आहे. गुरूवारी दिवसभरात २९८ नोंदी आढळून आल्या आहेत.

मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजातील व्यक्तींकडे असलेल्या कुणबी नोंदीचे अभिलेख जमा करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. तसेच, शासनस्तरावरही उपलब्ध नोंदी तपासल्या जात आहेत.
नगरमध्ये जिल्हास्तरावर ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आता मनपात असलेल्या जन्म व मृत्यू नोंदींची तपासणी सुरू करण्यात आली आहे. १९०३ ते १९२७ या काळातील मोडी लिपीतील
जन्माच्या १६ हजार ६०९ व मृत्यूच्या २६ हजार ५९६ अशा एकूण ४३ हजार २०५ नोंदी आरोग्य विभागाने तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या मोडी लिपीतील नोंदींची तपासणी करण्यासाठी राहुल भोर या तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली आहे.
मनपा कर्मचारी शीतल भिंगारदिवे त्यांना सहकार्य करत आहेत. तपासणी पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करू, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी सांगितले.