MLA Nilesh Lanke :- राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र, पवार परिवार एकसंघ राहिला पाहिजे. धर्मावर, चुकीच्या पध्दतीने काम करणारा पवार परिवार नसून विकासला प्राधान्य देणारा हा परिवार देशाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी एक राहिला पाहिजे. मला पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई यांनी निःस्वार्थ प्रेम दिले आहे, त्यांच्यात मी आवड, निवड कशी करू, असा सवाल करीत सर्व ठिक होईल, कार्यकत्यांनी निश्चंत रहावे, असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिट्यांचा आढावा घेण्यासाठी पारनेर शहरातील आनंद मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात आमदार लंके बोलत होते. बूथ कमिट्यांच्या आढाव्याबरोबरच राज्यात रविवारी झालेल्या राजकीय घडामोडींवर या मेळाव्यात चर्चा झाली. या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले, आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहोत. राष्ट्रवादी हा परिवार असून, पक्षाचे नेते मंडळी पक्ष तुटू देणार नाहीत. नेते कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. सात ते आठ वेळा आमदारकी भूषविलेले आमदारही आज संभ्रमात आहेत. मी तर नवीन आमदार आहे, त्यामुळे घाईने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कोणत्याही निर्णयासोबत पुढील १० वर्षांचे व्हिजन असले पाहिजे. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे इतिहास असतो. त्याचा विचार करावा लागतो. घडामोडींना संदर्भ असतात. कधी कधी आपण एकांगी विचार करतो. आपण खोलात जात नाही.
पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथ कमिट्यांची फेररचना करण्यात येणार आहे. बूथ कमिटीच्या स्थापनेसाठी आ. लंके हे गावोगावी भेटी देणार असून, त्यांच्या समक्ष बूथ कमिटीच्या सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. माझ्या नजरेला नजर मिळविल्यानंतर तो सदस्य धोका देणार नाही, असा विश्वास आ. लंके यांनी व्यक्त केला.
मी रडणारा नसून लढणारा आहे. काहीही झाले तरी त्यातून चांगलेच आऊटपूट निघेल. वाईट जरी घडले तरी वाईटातून चांगले घडविण्याची ताकद माझ्याकडे असल्याचे लंके यांनी सांगितले. लाल दिवा मिळणार असेल तर आ. लंके यांनी अजितदादा यांच्यासोबत जावे, अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली. तो धागा पकडून आ. लंके म्हणाले, लाल दिवा शुल्लक आहे. माणसं महत्वाची आहेत. पवार परिवाराने माझ्यावर निःस्वार्थ भावनेतून प्रेम केले आहे. धोका देऊन मला काहीही नको. एखाद्याचं ओरबाडून मला काहीही नको. चार वर्षांचा आपला जन्म. ३०-३५ वर्षे राजकारणात घालणारांनी अपेक्षा ठेवली नाही, त्यामुळे आपणही अपेक्षा ठेवणे योग्य नसल्याचे आ. लंके म्हणाले.
हे पण वाचा
- एका क्लिकवर मिळणार डिजिटल सहीचा सातबारा ! असा करा डाऊनलोड…
- आमदार निलेश लंके यांच्यावर मोठा आरोप ! फसवणूक केली…
- खासदार विखे आणि आमदार लंके समोर आले आणि झाले असे काही…