Nitin Desai Suicide : नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी एडलवाईजच्या संचालकांच्या बाबतीत कोर्टाने घेतला हा निर्णय! वाचा माहिती

nitin desai

Nitin Desai Suicide:- सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी नुकतीच त्यांच्या एन डी स्टुडिओ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून या प्रकरणाशी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नितीन देसाई यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून  आत्महत्या केल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद हे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते.

यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांच्या माध्यमातून देसाई यांच्या आत्महत्येच्या कारणाविषयी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आले होते. या सगळ्या प्रकरणांमध्ये एडलवाईज ॲसेट रिकस्ट्रक्शन आणि कंपनीचे संचालक रशेश शाह हे रडारवर आले होते. या सगळ्या प्रकरणावर एडलवाईज ॲसेट रिकस्ट्रक्शन कंपनीकडून एक पत्रक काढून बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

 पत्रकात काय म्हटले होते कंपनीने?

कंपनीने पत्रकात म्हटले होते की, नितीन देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे आम्हाला अतिव दुःख झाले असून या अत्यंत कठीण काळातून जात असलेल्या देसाई यांच्या कुटुंबीयांचे आम्ही सांत्वन करू इच्छितो असे या पत्रकात म्हटले आहे. तसेच नितीन देसाई यांनी जे काही कर्ज घेतले होते त्याचा देखील उल्लेख या पत्रकामध्ये नमूद करण्यात आला आहे.

यामध्ये एनसीएलटीने नितीन देसाई यांच्या एन डी आर्ट वर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेश 25 जुलै 2023 रोजी दिले होते. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याकरिता एनसीएलटीने जितेंद्र कोठारी यांची नियुक्ती देखील केली होती. कंपनीच्या या निर्णयाविरोधात एनडी आर्ट कंपनीने दिल्लीतील खंडपीठाकडे अपिल  केले होते. मात्र हे अपील फेटाळून लावण्यात आले होते असे देखील माहिती पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 नितीन देसाई यांच्या एनडी आर्ट कंपनीला देण्यात आलेला कर्जाचा तपशील

नितीन देसाई यांच्या कंपनीने नोव्हेंबर 2016 मध्ये 150 कोटी रुपयांचे कर्ज एडलवाईज कडून घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये 35 कोटीचे अतिरिक्त कर्ज देखील घेण्यात आले. परंतु जानेवारी 2020 पासून कंपनीकडून येणारे कर्जाचे हप्ते बंद झाले व कर्ज थकण्यास सुरुवात झाली. ही संपूर्ण रक्कम व्याजासहित 252 कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली.या प्रकरणांमध्ये आम्ही संबंधित यंत्रणेशी सहकार्य करायला कटिबद्ध आहोत असे देखील एडलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने म्हटले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर 2 ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर एडलवाईजच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता व हा गुन्हा रद्द करावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने दिलासा दिला नाही या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 ऑगस्टला पार पडणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीचा अंतरिम दिलासा देणारा आदेश देण्यास नकार दिला आहे.

तसेच खंडपीठाने आता या प्रकरणातील तक्रारदार देसाई यांच्या पत्नीला देखील नोटीस बजावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी न्यायालयात सांगितले की या प्रकरणातील एफ आय आर गेल्या आठवड्यातच नोंदविण्यात आला असून याचा तपास पोलिसांकडून अद्याप सुरू आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 18 ऑगस्ट रोजी याचिकांवर सुनावणी करणार असल्याचे सांगितले.

या प्रकरणांमध्ये एडलवाईज कंपनीचे संचालक राजकुमार बंसल, रशेश शाह, केऊर मेहता व जितेंद्र कोठारी या चारही व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र चार याचिका दाखल केले आहेत  व हा दाखल झालेला गुन्हा रद्द करावा अशी याचिकेत विनंती करण्यात आलेली आहे व या याचिकेमध्ये नितीन देसाई यांना कंपनीने कर्ज दिले व हे कर्ज वसुलीसाठी कंपनीने कायदेशीर पद्धतीचा व आरबीआयच्या नियमानुसारच अवलंब केला आहे. असं देखील म्हटले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe