Ahmednagar News : बीडच्या मादळमोहीपासून ते पाथर्डी- तिसगाव, करंजीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १०० किलोमीटरचा रस्ता अनेक गावांत रांगोळी, भगवे ध्वज, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांचे बॅनर, यांनी सजला आहे. मिडसांगवी, खरवंडी परिसरात एक ते दीड टन पोहे नाष्ट्यासाठी तयार करण्यात येणार आहेत.
फुंदेटाकळी फाटा ते आगसखांड फाटा परिसरात १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो लीटर आमटी व हजारो पाणी बॉटल रस्त्याच्या कडेला तयार ठेवण्यात आल्या आहेत. ३७ पोलिस अधिकारी व ३०० पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर मिडसांगवी, भवरवाडी, भालगाव व परिसरातील गावांतून नागरिक नाष्ट्याची सोय करणार आहेत. तेथे दीड टन पोहे तयार करण्यात येणार आहेत. खरवंडी व मुंगुसवाडे येथील ग्रामस्थांकडून खरवंडी येथे महामार्गावर केळी, बिस्कीट व पाणीबॉटलची सुविधा केली जाणार आहे
फुंदेटाकळी फाटा येथे कोरडगाव व परिसरातील २० गावांमधून नागरिक जेवणाची व्यवस्था करणार आहेत. आगसखांड फाटा येथे अनेक गावांतील नागरिकांनी जेवणाचे स्टॉल लावले आहेत. तेथे भाकरी, पिठलं, आमटी व आणखी विविध प्रकारच्या भाज्या तयार करून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक, राकेश ओला, दोन पोलिस उपाधिक्षक, ७ पोलिस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, ३०० पोलिस कर्मचारी, असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक राकेश ओला, पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करुन पोलिस बंदोबस्त कुठे द्यावा लागेल, याबाबत चाचपणी केली आहे.
आमटीच्या वीस कढाया येथे तयार करण्यात येणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून येथे भाकरीचे ट्रॅक्टर भरुन येणार आहेत. गावागावांना स्टॉल उभारण्यासाठी जागा निश्चीत करून देण्यात आली आहे.
सकल मराठा समाजाचे युवक कार्यकर्ते यासाठी गावागावांत नियोजन करून कष्ट घेत आहेत. मिडसांगवी, खरवंडी, येळी, कोळसांगवीफाटा, फुंदेटाकळी, पिंपळगव्हाणफाटा, शेकटेफाटा, आगसखांड फाटा, मोहोज देवढे, वाळुंज, तनपुरवाडी,
पाथर्डी, माळीबाभुळगाव, निवंडुगा, तिसगाव, निंबोडी, देवराई, सातवड फाटा, करंजी, अशा विविध गावांत राष्ट्रीय महामार्गावर स्टॉल लावून जरांगे पाटलांसोबत असलेल्या आंदोलकांना जेवण, पाणी, नास्टा, अशा सुविधा देण्यात येणार आहेत.
सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय कार्यकर्ते नियोजन करीत आहेत. आमदार मोनिकाताई राजळे, अँड. प्रतापराव ढाकणे यांचे समर्थक व सकल मराठा समाजाचे अनेक गावांतील कार्यकर्ते यासाठी कष्ट घेत आहेत.