Shirdi Loksabha : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
खरंतर, लोकसभा निवडणुका पार पडल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. यामुळे राजकीय पक्षांच्या माध्यमातून फक्त लोकसभा निवडणुकाच टार्गेट केल्या जात आहेत असे नाही तर त्यापुढील विधानसभेसाठी देखील आत्तापासूनच नियोजन सुरू झाले आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. प्रामुख्याने नगर जिल्ह्यात राजकीय वातावरण सर्वाधिक ढवळले गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ-मोठ्या घडामोडी देखील घडत आहेत.
खरेतर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ अशा या दोन जागा. मात्र या दोन्ही जागांवर इच्छुकांची संख्या वाढत आहे. यामुळे आगामी शिर्डी आणि नगर दक्षिणची लोकसभा खूपच रंगतदार होणार हे जवळपास नक्की झाले आहे.
आत्तापर्यंत महायुतीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वर्तमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांना तिकीट मिळणार असे वाटत होते. मात्र आता यामध्ये एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. ट्विस्ट निर्माण होण्याचे कारण असे की, उबाठा अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात नुकतीच एक मोठी घडामोड घडली आहे.
शिवसेनेत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रवेश केल्यानंतर नाराज झालेल्या बबनराव घोलप यांनी पक्षातून एक्झिट घेतली आहे. घोलप यांनी उबाठा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे.
म्हणजे ऐन लोकसभेपूर्वीच उबाठा शिवसेनेला मोठ खिंडार पडले आहे. मात्र उबाठा शिवसेनेला पडलेलं हे खिंडार उबाठा शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वर्तमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्यासाठी अधिक डोकेदुखी ठरणार आहे.
कारण की घोलप हे शिर्डी लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता त्यांनी उबाठा शिवसेनेला रामराम ठोकला आहे, पण त्यांची जवळीक एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत वाढत आहे. त्यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. यामुळे बबनराव घोलप यांचा लवकरच एकनाथ शिंदे शिवसेना गटात गृहप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत.
यामुळे शिर्डी लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून सदाशिवराव लोखंडे हे उभे राहणार की बबनराव घोलप यांना संधी मिळणार या चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान या जागेसाठी महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
मात्र असे असले तरी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या जागेसाठी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांना या जागेसाठी उमेदवारी मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे.
यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील तिकिटाची ही लढाई रंगतदार होणार आहे. यामुळे आता शिर्डी लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून कोण उभे राहणार आणि महाविकास आघाडीकडून कोण उभे राहणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.