Story Of KBC Winner ! कौन बनेगा करोडपती मधून 5 कोटी जिंकलेल्या या तरुणाची आता परिस्थिती मात्र…

Ajay Patil
Published:
story of kbc winner

Story Of KBC Winner :- पैसा हा चंचल असतो किंवा पैशाला नेहमी कामाला लावणे गरजेचे असते तरच पैसा वाढतो किंवा पैशाला पैसा लागतो अशी बरीच वाक्य आपण आजपर्यंत ऐकलेली असतील. तसे पाहायला गेले तर ही वाक्ये बऱ्याच प्रमाणात सत्य देखील आहेत. पैशाच्या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे तुम्ही किती पैसा कमावता याला महत्व नसून जो पैसा कमवता त्याला कशाप्रकारे गुंतवतात किंवा त्याची कशा प्रकारे बचत करता याला खूप महत्त्व आहे.

नाहीतर उधळपट्टी सुरू ठेवली तर महिन्याला लाखो रुपये कमवले तरी ते पुरणार नाहीत हे तेवढेच सत्य आहे. त्यातल्या त्यात माणूस काबाडकष्ट करून आणि दीर्घ कालावधीच्या कष्टाने जेव्हा चांगल्या प्रकारे पैसा कमवतो तेव्हा त्याला त्या पैशांची किंमत असते हे देखील तितकेच खरे असते. परंतु लॉटरी किंवा काही केबीसी सारखे टीव्ही शो मधून अचानक जास्त पैसे जिंकलेला व्यक्ती पैशांची तजबीज किंवा गुंतवणूक कशा प्रकारे करू शकतो?

हा देखील एक मोठा प्रश्न पडतो. कारण अचानक आलेला पैसा व्यक्तीला नको त्या गोष्टी करायला भाग पाडू शकतो किंवा व्यक्ती त्या पद्धतीने वागू शकते व त्याचा परिणाम कालांतराने खूप भयानक होतो हे देखील वास्तव सत्य आहे. याच मुद्द्याला धरून आपण बिहार राज्यातील एका तरुणाची कहाणी पाहणार आहात जो कौन बनेगा करोडपतीच्या पाचव्या सेशनमध्ये तब्बल पाच कोटी रुपये जिंकला होता परंतु त्याची आताची परिस्थिती पहिली तर तो दिवाळखोरीच्या वाटेवर आहे.

 पाच कोटी ते दिवाळखोरी पर्यंतचा प्रवास

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती हा खूप लोकप्रिय ठरलेला टीव्ही शो असून आतापर्यंत या कार्यक्रमाचे 14 सीजन पूर्ण झालेले आहेत व ते यशस्वी देखील झालेले आहेत. लवकरच केबीसीचा पंधरावा सीजन देखील टीव्हीवर येण्याची शक्यता आहे. परंतु या पार्श्वभूमीवर याच कौन बनेगा करोडपतीच्या पाचव्या सीजनचे विजेते सुशील कुमार यांच्या बद्दल माहिती घेतली तर ते तब्बल पाच कोटी रुपये जिंकले होते.

विचार करा की पाच कोटी अचानक जिंकल्यानंतर माणसाच्या जीवनात किती बदल होऊ शकतो किंवा त्याचे जीवन किती सार्थकी लागू शकते. परंतु सुशील कुमारच्या बाबतीत घडले उलटेच. सुशील कुमारने आपल्या फेसबुक पेजवर त्याचा अनुभव पोस्ट केला आहे. या पोस्टमधून त्याने  केबीसी मधून पाच कोटी जिंकल्यानंतर जीवनातील सर्वात वाईट टप्प्यांचा उहापोह केलेला आहे. साधारणपणे 2011 मध्ये बिहारचा रहिवासी असलेला सुशीलने पाच कोटी रुपये जिंकले होते.

परंतु या जिंकलेल्या पाच कोटींचा योग्य वापर सुशीलकुमार करू शकले नाही आणि नको तिथे पैसा खर्च करून आज दिवाळखोर झाले आहेत. सुशील कुमार फेसबुक पोस्टमध्ये म्हणतो की, पाच कोटी जिंकल्यानंतर अनेक लोकांनी आपली फसवणूक केल्याचे त्याने उघड केले असून पैसे जिंकल्यानंतर आपण धर्मादाय कार्यामध्ये खूप सक्रिय झालो पण आसपासच्या लोकांनी फसवले असे देखील त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या सगळ्या कालावधीमध्ये सुशीलकुमार याला दारू आणि धूम्रपानाचे व्यसन देखील लागले. त्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाला व पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे त्यांचे नाते आता घटस्फोटापर्यंत येऊन ठेपलेले असल्याचे देखील सुशील यांनी सांगितले आहे. दिवाळखोर झाल्यानंतर सुशीलने जीवनामध्ये अनेक धक्के खाल्ले व त्यानंतर बॉलीवूडमध्ये नसीब आजमावता  येते का हे पाहण्यासाठी मुंबईला देखील आला.

परंतु हे सगळे प्रयत्न असफल झाले. या सगळ्या त्रासामधून किंवा या सगळ्या मार्गानंतर 2016 मध्ये सुशील गावी परतला व त्या ठिकाणी त्याने नवीन आयुष्य सुरू करण्याचे ठरवले. आता सुशील एका ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत असून पर्यावरणवादी म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष देखील केंद्रित करत आहे.

यावरून आपल्याला समजून येईल की, पैशाचा योग्य वापर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूकच फायद्याची ठरते. नको त्या ठिकाणी पैशांचा वापर केला किंवा उधळपट्टी केली तर तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तो संपायला वेळ लागणार नाही हे मात्र निश्चित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe