Surat-Chennai Expressway:- महाराष्ट्रामध्ये बऱ्याच एक्सप्रेसवे चे काम हाती घेण्यात आलेले असून काही प्रस्तावित आहेत. काही दुसऱ्या राज्यातून जाणारे महामार्ग देखील महाराष्ट्रातून जात असल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या अनुषंगाने जर आपण पाहिले तर कुठलेही प्रकल्प किंवा एक्सप्रेस वे पूर्ण होण्याकरिता लागणारे भूसंपादन हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो.
जोपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया वेगात पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाला वेग येऊ शकत नाही. त्यामुळे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध होत असल्यामुळेच महत्त्वाचा असलेला सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेचे काम रखडण्याच्या स्थितीत आहे. तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांचा भूसंपादनाला होणारा विरोध देखील एक प्रकारे रास्तच असल्याचे सध्या चित्र आहे. नेमका शेतकऱ्यांचा का या महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध आहे? या मागचे काही कारणे आपण या लेखात जाणून घेऊ.
सुरत–चेन्नई एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे करिता ज्या काही जमिनी संपादित करण्यात येत आहेत त्यातील ज्या काही जमिनी गावाशेजारील म्हणजेच गावठाण हद्दीत आहेत त्यांना देखील शेतीचा दर देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे नागनहळी आणि बार्शी तालुक्यातील लक्ष्याची वाडी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी गावठाणच्या जागेला किंवा जमिनीला प्रति चौरस मीटर दर आकारावा अशा पद्धतीची मागणी केली आहे.
त्यामुळे वैराग या ठिकाणी उभारला जात असलेल्या ट्रम्पेटला विरोध केला जात आहे. जर हे ट्रम्पेट रद्द झाले तर चार तालुक्यांचे यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. जर या एक्सप्रेस वे करिता करण्यात येत असलेल्या भूसंपादनाचा विचार केला तर आतापर्यंत बोटावर मोजता येतील एवढ्या शेतकऱ्यांनी मिळणारा मोबदल्याचा स्वीकार केलेला आहे.
इतर शेतकऱ्यांना मिळत असलेल्या मोबदल्याचे दर मान्य नसल्याने मोबदला घेणे टाळले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींना कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनापोटी मिळणारा मोबदला स्वीकारायला नकार दिला आहे.
महत्वाच्या असलेल्या ट्रपेटला विरोध
सुरत ते चेन्नई एक्सप्रेस वे वर ये जा करता यावे याकरिता उभी करण्यात येत असलेल्या सुविधेला ट्रम्पेट असे म्हणतात. हा महामार्ग ज्या ठिकाणी महत्त्वाच्या रस्त्याला छेद देणार आहे याच ठिकाणी हे ट्रंपेट तयार करण्यात येत आहे. जर आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे तांदूळ वाडी, हसापूर, शेगाव तसेच वैराग व अलीपुर रोड बार्शी या ठिकाणी हे ट्रंपेट प्रस्तावित करण्यात आलेले आहेत व यातील सर्वात महत्त्वाचे असलेले ट्रंपेट हे वैराग जवळ आहे.
कारण वैराग या ठिकाणी सध्या असलेला तुळजापूर ते वैराग हा रस्ता आहे व त्याच्या जवळच बार्शी सोलापूर हा रोड देखील आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रस्तावित असलेल्या नागपूर ते गोवा या महामार्गाचे क्रॉसिंग देखील या ठिकाणीच आहे. त्यामुळे वैराग या ठिकाणी असणारे ट्रंपेट हे त्या ठिकाणचा कायापालट करणारे ठरणार आहे व कमीत कमी चार तालुक्याला याचा फायदा मिळणार आहे. परंतु याला देखील आता मिळणाऱ्या मोबदल्यावरून विरोध होताना दिसून येत आहे.
लक्षाची वाडी या ठिकाणी देखील या कारणामुळे होत आहे विरोध
जर आपण बार्शी तालुक्यातील लक्षाची वाडी या गावाचा विचार केला तर हे बार्शी ते परंडा रस्त्यावरील पहिले गाव असून ते बार्शी शहराजवळ आहे व या परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचे एनए करून त्याचे नकाशे देखील तयार करून घेतलेले आहेत. या ठिकाणी गुंठेवारीने जमिनीची विक्री होते. परंतु सुरत ते चेन्नई या एक्सप्रेस वे करिता संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी ज्या शेतकऱ्यांचे नकाशे तयार झालेले नाहीत त्यांच्या जमिनीला हेक्टर प्रमाणेच शेतीचे दर देऊ करण्यात आले आहेत व त्यामुळे शेतकऱ्यांचा याला विरोध होत आहे.