कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त पिक उत्पादन घेता येते हे बऱ्याच शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि योग्य व्यवस्थापन, पिकासाठी करावी लागणारी प्रत्येक गोष्ट त्याच वेळेत करणे इत्यादी बाबींमुळे हे शक्य झाले आहे. त्यासोबतच कष्ट तर अपरिहार्य असतोच.
त्यासोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते. पारंपारिक शेतीला झुगारून आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. याचेच उदाहरण जर आपण घेतले तर सातारा जिल्ह्यातील एकंबे या ठिकाणाच्या युवा शेतकरी अजय चव्हाण यांनी आले शेतीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले आहे.

1 एकरमधून 50 गाड्या आल्याचे उत्पन्न
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सातारा जिल्ह्यातील एकंबे या गावचे रहिवासी असलेली युवा शेतकरी अजय दादासाहेब चव्हाण यांनी एका एकर मधून तब्बल 50 गाड्या आल्याचे उत्पन्न घेण्याची किमया करून दाखवली आहे. मे 2022 मध्ये आल्याची लागवड केली व योग्य व्यवस्थापन ठेवून त्यांनी हे उत्पादन मिळवले.
एकंबे हे कोरेगाव तालुक्यातील गाव असून संपूर्ण पट्टा हा बागायती आहे. आल्याची शेती करताना कोरेगाव येथील अनेक अभ्यासू शेतकऱ्यांचा सल्ला त्यांनी घेतला व ही किमया साधली. आल्यासोबत उसाचे उत्पादन देखील त्यांनी विक्रमी असे घेतले आहे.
अजय चव्हाण यांनी अशा पद्धतीने केले आले पिकाचे नियोजन
अजय चव्हाण यांनी मे 2022 मध्ये एका एकर मध्ये आल्याची लागवड केली व त्याचे खांदणी ही 2023 मध्ये केली होती. आले पिकासाठी खतांचे व्यवस्थापन करताना प्रामुख्याने निंबोळी पेंड, निम ऊर्जा सुपर, नोवाटेक प्रो व एप्पल जी यांचा प्रामुख्याने वापर केला. एवढेच नाही तर धनश्री कंपनीचे वॉटर सोल्युबल खते व त्यासोबतच 0:40:37,09:46,14:48 हायड्रो स्पीड त्यांनी ड्रिप मधून आले पिकाला दिले.
फवारणीचे नियोजन हे दर आठवड्याला या पद्धतीने केले. सगळ्या नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडू देता त्यांनी सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर केल्याने त्यांना हे विक्रमी उत्पन्न मिळवणे शक्य झाले. एवढेच नाही तर एका एकर मध्ये 80 ते 90 टन उसाचे उत्पन्न देखील त्यांनी मिळवले आहे. यामागे कृषी कांचनचे संचालक असलेले नितीन भोसले यांचे अनमोल मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
परंतु त्यांनी म्हटले की मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते परंतु तरीदेखील तुमची नियोजन आणि वेळेवर त्या नियोजनाची केलेली अंमलबजावणी खूप गरजेचे असते तरच बागायतदार यशस्वी होऊ शकतो व याच नियोजनामुळे आणि परफेक्ट कालावधीमुळे त्यांना एका एकर मध्ये 50 गाडी आल्याचे उत्पन्न मिळवणे शक्य झाले.