सातबारा उताऱ्यावर बऱ्याचदा नावांमध्ये चूक झालेली असते किंवा एकूण क्षेत्रामध्ये देखील चूक दिसून येते. अशा प्रकारचा चुका या प्रामुख्याने संगणकाच्या साह्याने टायपिंग करताना किंवा पूर्वी जो काही हस्तलिखित पद्धतीने सातबारा उतारा दिला जायचा तेव्हा प्रामुख्याने झालेले आहेत. परंतु अशा चुकांमुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. अशा चुका दुरुस्तीसाठीचे अनेक अर्ज प्रलंबित असल्यामुळे आता सरकारने याबाबतीत एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असून आता अशा प्रकारच्या दुरुस्त्या या ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत.
साधारणपणे एक ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात ही मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत या माध्यमातून 7 हजार पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. हे काम वेगात व्हावे म्हणून आता अशी दाखल झालेल्या अर्जांवर तातडीने सुनावणी घेऊन त्याचे निर्णय देण्याचे निर्देश देखील तहसीलदारांना देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ही जी काही सगळी प्रक्रिया आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांचे देखील लक्ष असणार आहे. आता अशा पद्धतीने चुका झालेल्या किंवा दुरुस्ती न झालेले सातबारे उतारे दुरुस्त करण्याचा अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
अशा पद्धतीने केली जाणार दुरुस्ती
अशा पद्धतीच्या सातबारावर चुका दुरुस्तीसाठी जे काही अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत ते बरेच तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित आहेत. असे अर्ज हे लिखित स्वरूपात असल्यामुळे प्रलंबित राहण्याचे प्रमाण जास्त आहे. आता ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेले अर्ज किती स्वरूपात प्रलंबित आहे त्याचे रेकॉर्ड ठेवणे आता शक्य आहे.
या माध्यमातून आता ई हक्क पोर्टलवरून सातबारा फेरफार यावर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला लागणारी सगळे आवश्यक असे कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच हा अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी संबंधित कागदपत्रांचे पुरावे तपासले व त्यांची पूर्तता केली जाणार असून ही दुरुस्ती तहसीलदारांकडे नंतर मान्यतेसाठी पाठवली जाईल व दुरुस्ती केली जाणार आहे.
दाखल झालेल्या ऑफलाईन अर्जांची केली जाणार ऑनलाईन एन्ट्री
आतापर्यंत सुमारे पाच लाख अर्ज दुरुस्तीकरिता प्रलंबित असून यामध्ये एक लाख पेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने आलेले आहेत. त्यामधील 59 हजार 230 अर्ज स्वीकारण्यात आले असून 39 हजार पेक्षा जास्त अर्ज हे त्रुटींची पूर्तता करण्याकरिता प्रलंबित आहे. तसेच 6000 पेक्षा जास्त अर्ज हे तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत.
या सगळ्या मुळे आता सर्व जिल्ह्यांमध्ये सातबारा दुरुस्ती अर्जांचा आढावा घेण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या असून ऑफलाइन पद्धतीने दाखल झालेले प्रलंबित अर्जांची देखील आता ऑनलाईन एन्ट्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.