Health News : दिवाळी आली की मिठाई हवीच. परंतु नेमकी या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही लोक या मिठाईत भेसळ करीत असून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
दरवर्षी दिवाळीचा उत्साह कैक पटींनी वाढतच आहे. दिवाळी म्हटलं की गोड धोड पदार्थ आलेच. अनेक दिवाळीच्या फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात तर काही दुकानातून मागवले जातात.
सध्याच्या काळात कुटुंबाचा आकार छोटा होत चालला असल्यामुळे व वेळ नसल्याने घरी फराळ बनविणे अवघड होत चालले आहे. मग अशा वेळी सर्वच पदार्थ बाजारातून रेडीमेड विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे मिठाईच्या दुकानांपुढच्या रांगा लांबच लांब होत आहेत.
याच गर्दीचा फायदा काही भेसळखोर घेत आहेत. त्यामुळे तुम्ही घेतलेली मिठाई भेसळीची तर नाही ना, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. कारण या बनावट व भेसळयुक्त मिठाईमुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.
बनावट मिठाई बनविणारे भेसळखोर खवा आणि दुधात विविध केमिकल कालवतात. त्यात फर्टिलायझर,बटाटा, आयोडीन, डिटर्जंट, सिंथेटिक दूध, व्हाईटनर, चॉक, युरिया आणि इतर प्रकारच्या घातक रसायनांचा समावेश होतो. मिठाईला सजविण्यासाठी चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वापर केला जातो, जो की आरोग्याला अत्यंत घातक असतो.
मिठाईमध्ये रंगाच्या नावाखाली रसायने मिसळली जातात, तसेच बनावट मावा, नकली दूध यांचा वापर केला जातो. यामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. अशा मिठाईच्या सेवनाने कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार आणि अनेक प्रकारच्या अॅलर्जी होऊ शकतात,
अनेक ठिकाणी मिठाईत भेसळ करताना त्यात स्टार्च आणि अनसॅच्युरेटेड फॅटसारख्या गोष्टी मिसळल्या जातात, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी खूप वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
मिठाईवरील अॅल्युमिनिअमचे कण पोटात जाऊन मेंदू आणि हाडांना मोठं नुकसान पोहोचवते. याच्या सेवनाने मुलांच्या किडनीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. यासाठी बाजारातून मिठाई विकत घेताना सतर्क राहणं गरजेचं आहे.
स्थानिक बाजारपेठेत तयार होणारा खवा आणि दिवाळीनिमित्त मिठाईसाठी लागणारा खवा याचे प्रमाण व्यस्त आहे. जितकी मिठाई विकली जाते, तितका खवा परिसरात तयारच होत नाही. साहजिकच हा खवा बाहेरून आणला जातो.
हा खवा आणताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. याची केमिकल टेस्टही केली जात नाही. त्यामुळे हा खवा भेसळयुक्त असण्याची शक्यताच जास्त असते.