Health News : सामान्यपणे फ्लू म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएंझा चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचा प्रसार वर्षभर होतच असतो, पण पावसाळा आणि हिवाळ्यात तापमानातील चढ-उतारांमुळे त्याचा प्रसार अधिक वेगाने होतो. लहान मुलांना यातील कोणत्याही विषाणूमुळे फ्लूची लागण होऊ शकते आणि मग संपूर्ण घराला फ्लूची लागण होते.
फ्लूच्या विषाणूचा संसर्ग नाक, घसा आणि काही वेळा फुप्फुसांमध्येही होतो. ५ वर्षांखालील मुले व ज्येष्ठ नागरिकांना, रुग्णालयात दाखल करावे लागण्याच्या तसेच त्यांचा मृत्यू होण्याच्या प्रमुख कारणांपैकी हे एक आहे.
फ्लूमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींमध्ये जीवाणूजन्य न्यूमोनिया, कानाचा तसेच सायनसचा प्रादुर्भाव आणि पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय अवस्था आणखी बळावणे आदींचा समावेश होतो.
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्ण विकसित न झाल्यामुळे तसेच ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असल्यामुळे त्यांना या गुंतागुंतींचा सामना करणे कठीण होते. फोर-इन-वन (४-इन- १) फ्लू लस हा फ्लूच्या सर्व चार विषाणूंपासून होणाऱ्या प्रादुर्भावाचा धोका किमान स्तरावर ठेवण्याच्या सर्वात प्रभावी मागांपैकी एक आहे.
६ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील लहान मुले आणि ५० वर्षांवरील वयाच्या व्यक्ती यांना, गुंतागुंत टाळण्यासाठी दरवर्षी फ्लूची लस दिली जावी, अशी शिफारस इंडियन अॅकॅडमी ऑफ पिडिअॅट्रिक्स (आयएपी) आणि जागतिक आरोग्य संघटना करतात.
पावसाळ्यात हवामान दमट होऊ लागल्यानंतर फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळा पुन्हा सुरू होतात आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये फ्लूच्या संसर्गाचा धोका वाढतो. ५ वर्षांखालील लहान मुलांमध्ये आणि अन्य गंभीर आजार असलेल्या मुलांमध्ये फ्लूमुळे होणाऱ्या गुंतागुंतींना बळी पडण्याचा धोका अधिक असतो.
न्यूमोनिया, दुय्यम प्रादुर्भाव, डायरिया, ब्राँकायटिस, श्वसनाला त्रास आणि रेस्पिरेटरी फेल्युअरसारख्या गुंतागुंती फ्लूमुळे निर्माण होऊ शकतात. दरवर्षी घेण्याची फोर-इन-वन फ्लू लस सुरक्षित आहे आणि वैयक्तिक आरोग्याच्या अन्य सवयींचे अनुसरण जोडीने केल्यास ही लस लहान मुलांचे प्रादुर्भावापासून संरक्षण करू शकते.
या लसीकरणाबाबत आणि मुलांचे फ्लूपासून संरक्षण करण्याबाबत डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा. दरवर्षी फोर-इन-वन फ्लू लस घेण्याची आवश्यकता सिद्ध झालेली आहे. चारही प्रकारचे फ्लू विषाणू सातत्याने म्यूटेट होत असतात आणि दरवर्षी नवीन स्ट्रेन्स संक्रमित होतात.
मागील लसीने पुरवलेली रोगप्रतिकारशक्ती पुढील म्युटेट झालेल्या स्ट्रेन्सपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी नसते. डब्ल्यूएचओ दरवर्षी सक्रिय होण्याची संभाव्यता असलेले विषाणू विश्लेषणाच्या आधारे निश्चित करते आणि त्या विषाणूंना प्रतिरोध करण्यासाठी वार्षिक लसीकरण तयार केले जाते.
फ्लूच्या विषाणूचे संक्रमण लहान मुलापासून अन्य लहान मुलांना किंवा प्रौढांना जलद गतीने होते. प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीला फ्लूची लक्षणे जाणवायला लागण्याआधीच विषाणूचे संक्रमण सुरू होते. खोकला, ताप, घसा खवखवणे, थकवा जाणवणे, स्नायूदुखी आणि डोकेदुखी ही फ्लूची सामान्य लक्षणे आहेत.
फ्लूचा प्रादुर्भाव झालेले लहान मूल किंवा प्रौढ व्यक्ती जेव्हा बोलते, खोकते किंवा शिकते, तेव्हा तिच्या उच्छ्वासातील सूक्ष्म थेंबामार्फत फ्लूच्या विषाणूचे संक्रमण होते. हे सूक्ष्म थेंब दरवाजांवर, शाळेतील बाकांवर, पुस्तकांवर किंवा खेळण्यांवर पडले आणि या वस्तूंना अन्य मुलांचा स्पर्श झाला, तर त्याद्वारे संक्रमण होते. शाळा किंवा खेळाच्या मैदानावर लहान मुले व प्रौढ दोघांमार्फत फ्लूच्या विषाणूचे संक्रमण होते.