Health News : उन्हाळ्यात ताक आरोग्यदायी…!

Ahmednagarlive24 office
Published:
Health News

Health News : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, शितपेय पिण्यावर भर दिला जातो. बाजारात विविध प्रकारचे शितपेये मिळतात, मात्र शरीरासाठी थंडाई देणाऱ्या पेयांमध्ये ताकाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत मानले जात असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते फायदेशीर आहे. शक्यतो ताक ताजे हवे. ताक हे घरोघरी सहज उपलब्ध असते. शिवाय ते तातडीने तयारही करता येते.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ताक हे प्रोबायोटिक आहे. ताकात बी-१२ व्हिटॅमिन असते. दह्यामुळे काहींना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मात्र, ताकाने तसे होत नाही. काही पोटाचे आजार असणाऱ्यांनी जेवणाऐवजी नुसते ताक पिले, तरी त्यांना समाधान मिळते.

ताकाचे जिवाणू प्रोबायोटिक असतात आणि ते आपणाला तंदुरुस्त ठेवतात. कॅलरीबाबत जागरूक असणारे, वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांनी ताक पिणे फायदेशीर आहे. काही जण ताकाने अॅसिडिटी होते, असे म्हणतात. परंतु, असे व्हायला नको. असा त्रास होऊ नये, यासाठी शिळे म्हणजे आंबट ताक पिऊ नये. लोणी न काढलेले ताक खूप चांगले. लाकडी रवीने घुसळलेले ताक स्वादिष्ट असते.

ताकात मीठ किंवा साखर टाकून पिल्यास पोटाचे विकार दूर होतात. तुपासाठी सायीसकट विरजण लावतात. केवळ ताकासाठी विरजण लावायचे असल्यास साय काढून कोमट दूध वापरतात. अशा विरजणासाठी ताजे, गोड दही वापरावे. विरजणासाठी मातीचे पसरट तोंडाचे पात्र सर्वोत्तम. मातीचे पात्र नसल्यास चिनी मातीचे किंवा काचेचे भांडे वापरता येते.

आयुर्वेदात ताकाला अमृत मानले जाते, त्याचे फायदे अनेक आहेत. ताक पचायला हलके आहे. अग्निदीपन करणारे म्हणजे पचनशक्ती वाढविणारे आहे. वात, पित्त, कफ या तिन्ही विकारांवरचा ताक हा चांगला उपाय आहे. आधी दही थोडेसे घुसळून घेतल्यावर नंतर थोडे थोडे पाणी मिसळून घुसळावे.

ताक फ्रीजमध्ये ठेवल्यास सकाळचे सायंकाळी पिता येते, कोल्ड्रिंक ऐवजी चांगला पर्याय आहे. आजारी माणसे, दूध पचत नसलेली लहान मुले अशांना पर्याय म्हणून ताकापासून पेज करून देता येते. ताकामध्ये मीठ, साखर, जिरेपूड, पुदीना टाकल्यास चांगले लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe