Brain Stroke : कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख फार कमी होतो. परंतु, हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. हा आकडा एक वर्षात सुमारे २० लाखापर्यंत पोहोचतो.
त्यापैकी जवळपास ७ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील ब्रेन स्ट्रोकग्रस्त नागरिकांपैकी २० टक्के नागरिकांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे. शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये देखील दरमहा ३० रुग्ण ब्रेन स्ट्रोकचे दाखल होत आहे, अशी माहिती साई संस्थानच्या साईबाबा हॉस्पिटल न्यूरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी दिली.
दरवर्षी २९ ऑक्टोबर हा जागतिक पक्षाघात दिवस म्हणून पाळला जातो. याच्यापूर्व संध्येला डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले, ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
पहिला रक्त पुरवठा कमी होणे, ज्या मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेक्सच्या स्वरूपात चरबी जमा होते. यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो किंवा पूर्णपणे बंद होतो. हे रक्तातील ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह अवरोधित करते. ज्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरतात.
दुसरा रक्तस्त्राव होणे, ज्या मध्ये मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होतो. दोन्ही प्रकारच्या स्ट्रोक मध्ये मेंदूला इजा होवून नुकसान होवू शकते. प्रसंगी मृत्यूही ओढवतो. पूर्वी शहरी भागात जास्त असणारा स्ट्रोक आता ग्रामीण भारतात ही वाढत चालला आहे.
श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटमध्ये साधारणतहा ३०% लोक हे वय वर्ष ४० पेक्षा कमी असून तरुण लोकांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब असल्याचे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.
ह्या कारणामुळे होतो ब्रेन स्ट्रोक
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, व्यायामाच अभाव, उच्च कोलेस्ट्रॉल, चुकीची आहार पद्धती, हृदयरोग, अनियमित वा कमी झोप, व्यसन, प्रदूषण आदी कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोकची सामान्य लक्षणे
चेहरा वाकडा होणे, अवयवात अशक्तपणा जाणवणे, हात व पाय लुळा झाल्यासारखा होणे, बोलण्यात बदल होणे, चालण्यात अडचण येणे, दृष्टी कमी होणे किंवा दिसायला अचानक धूसर होणे ही ब्रेन स्ट्रोकची सामान्य लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितले.
रोज एक तास चालल्यास किंवा हलका व्यायाम केल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो अशी माहितीही डॉ. चौधरी यांनी दिली. सध्या ब्रेन स्ट्रोकवर अनेक आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.
योग्य वेळी उपचार केल्यास रक्तवाहिनी मधील अडथळा इंजेक्शन काढून टाकल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होवू शकतो. परंतु त्यासाठी मेंदूच्या पेशी मृत होण्याआधीच जलद उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.