Health Tips:- सध्या ऍसिडिटीची समस्या अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अगदी थोडेसे काही खाल्ले तरी देखील ऍसिडिटी होते व व्यक्ती यामुळे खूप त्रस्त होते. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे अँटॉसिड सिरप आणि गोळ्या घेतल्या जातात.
याचा तात्पुरता फरक पडतो. परंतु कायमस्वरूपी ऍसिडिटी पासून आराम मिळत नाही. तसेच अशा प्रकारचे औषधे किंवा गोळ्या जर वारंवार घेतले तर फायदा होण्याऐवजी शरीराला त्रास होण्याची शक्यता वाढते. कधीकधी अशा प्रकारचे औषधे जास्त काळ घेतल्यावर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

तसेच भूक देखील कमी होते. कधी कधी काही प्रकारच्या गाठी देखील होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे फायद्याचे ठरते. याकरिता गोळ्या व एखादे औषध घेण्यापेक्षा ऍसिडिटी होऊ नये म्हणून काही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.
ऍसिडिटी होऊ नये म्हणून ही काळजी घ्या
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिखट, तळलेले पदार्थ खाण्याचे कटाक्षाने टाळावे.
2- बऱ्याच व्यक्तींना अतिशय कडक पद्धतीने उपवास करण्याची सवय असते. परंतु तुम्हाला जर ऍसिडिटी पासून मुक्तता हवी असेल तर अशा प्रकारचा उपवास करू नये. उपवासामध्ये फळ किंवा फळांचा रस, दूध इत्यादी घेत राहावे.
3- तसेच जास्त वेळ जागरण करू नये. मदयपान व धूम्रपान टाळावे.
4- बऱ्याच जणांना ब्रुफेन सारख्या पेन किलर घेण्याची सवय असते. त्यामुळे अशा वेदनाशमक गोळ्या घेणे बंद करावे.
5- काही ताणतणाव असेल तर काळजी न करता त्याला धैर्याने तोंड द्यावे.
6- तसेच आहार सात्विक असावा. म्हणजेच आहारामध्ये वरण,तूप, भात, पोळी भाजी, दही, कोथिंबीर इत्यादींचा समावेश करावा.
7- तसेच जेवण करताना ते सावकाश जेवावे. प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा. कारण घास चावल्याने तो मऊ होतो व त्यामुळे जठरावरचा ताण कमी होतो. तसेच घासामध्ये लाळ मिसळते व ही लाळ अल्कलाइन असते व त्यामुळे ऍसिडिटी कमी होते.
8- दर बारा दिवसांनी लागोपाड तीन दिवस योगातील जलधवूती शुद्धिक्रिया करावी.
9- बरेच जण ऍसिडिटी कमी करण्यासाठी दूध पितात. दूध पिल्यामुळे ऍसिडिटी काही कालावधीसाठी कमी होते. परंतु दोन तासांनी पुन्हा वाढते म्हणून दूध पिणे टाळावे.
10- आयुर्वेद आणि निसर्ग उपचार पद्धतीनुसार बघितले तर ऍसिडिटी करिता बरेच उपाय सांगितले आहेत व यामध्ये केळी तसेच बदाम हे ऍसिडिटीचे प्रतिबंधक आहेत. अननसाचा रस, आवळ्याचा रस तसेच आमलकी पावडर हे सुद्धा आम्लपित्तावर उपयुक्त आहेत.
11- तुळशीची पाने, बडीशोप व दालचिनी यामुळे जठरातील आवरणावर म्युकॉस पदार्थाचा एक थर निर्माण होऊन ऍसिडिटी पासून जठराचे संरक्षण होते व त्रास कमी होतो.













