Health News : महाराष्ट्रातील महिलांचे आरोग्य धोक्यात ! किडनीविकाराचा वाढला धोका !

Ahmednagarlive24 office
Published:
Health News

Health News : किडनीविकाराशी संबंधित आजाराने त्रस्त असलेल्या शंभर रुग्णांपैकी ८५ रुग्ण या महिला असल्याचे प्रमाण चिंतेचा विषय बनले आहे. मूत्ररोगग्रस्तांमध्ये महिलांची वाढणारी संख्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांकडून वर्तवला जात असल्याची माहिती किडनीविकारतज्ज्ञ डॉ राजीव कोरे यांनी दिली.

शरीराला आवश्यक पाण्याची कमतरता आणि मूत्रविसर्जनात येणारे अडथळे या दोन प्रमुख कारणांमुळे किडनीविकाराचा विळखा महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक बसत आहे. राज्यात रोज ५० मूत्ररोगग्रस्त महिला रुग्ण वाढत असून, यामध्ये ३० ते ६० वयोगटातील महिलांचा समावेश आहे.

महिला आरोग्याविषयी वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने सर्वेक्षण होत असते. काही व्याधी किंवा आजार महिलांमध्ये वाढत असल्याचे या सर्व्हेतून अधोरेखित होत आहे. यामध्ये सध्या महिलांच्या आरोग्याबाबत महत्त्वाचा प्रश्न गंभीर होत आहे.

किडनीविकारांमध्ये मूत्रपिंडावर ताण येणे, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होणे, गर्भाशयाजवळील जागेला इजा पोहोचणे, ओटीपोटात दुखणे, किडनीतील पाण्याचा अंश कमी होणे यासारख्या आरोग्य समस्यांना महिला तोंड देत आहेत.

अशी आहेत कारणे

पाणी पिण्याचे अल्प प्रमाण, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळे मूत्रविसर्जन रोखून धरण्याची मानसिकता, मानसिक तणाव, गर्भधारणा ते प्रसूती या काळात निर्माण झालेली गुंतागुंतीची परिस्थिती, सिझेरियन प्रसूतीनंतर ओटीपोटावर आलेला ताण यामुळे त्रास सुरू होतो यातून किडनीविकाराची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते.

सार्वजनिक असुविधांचा परिणाम

सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव आहे. परिणामी, नोकरदार, कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या महिला, फिरते काम करणाऱ्या महिलांना मूत्रविसर्जनासाठी सुविधा मिळत नाही. यामुळे मूत्रविसर्जन रोखून धरले जाते, तसेच पाणी पिणे टाळले जाते.

अनेक ठिकाणी नोकरदार महिलांना कॉमन बाथरूमचा वापर करावा लागतो.यामुळे युरिन इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. राज्य महामार्गावरही महिलांसाठी स्वच्छतागृहांची वानवा असल्याने प्रवासात महिलांच्या किडनीवर ताण येण्याचे प्रमाण जास्त आहे. सामाजिक असुविधांमुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

महिलांना मूत्रजंतुसंसर्गाचा अधिक धोका

भारतात मूत्रविकार व किडनीरोग तजज्ञांची संख्या तीन हजार इतकी आहे. किडनीविकाराची कारणे, लक्षणे, काळजी, उपाय तसेच या आजारातील स्त्री पुरूषांचे प्रमाण याविषयी युरोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सव्र्हेक्षण केले जाते.

याअंतर्गत फिमेल अँड फंक्शनल युरोलॉजिकल सेक्शन म्हणजे एफएफयूएस या विभागातील तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीनुसार किडनीविकार आणि मूत्ररोगाने त्रस्त रुग्णांमध्ये महिलांचे वाढते प्रमाण असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

तसेच एसआरएल ही संस्थाही किडनीविकाराचे वाढते प्रमाण व रूग्णांचे वर्गीकरण यावर अभ्यास करते. त्यांच्या निष्कर्षानुसार महिलांना मूत्ररोग व मूत्रजंतुसंसर्गाचा अधिक धोका असल्याचे नमूद केले आहे.

किडनीसंबंधित विकार हा सायलेंट किलर आहे. विशेषत: महिलांमध्ये मूत्ररोगाशी संबंधित आजार वाढत आहेत. महिलांनी रोज किमान ३ ते ५ लीटर पाणी प्यायला पाहिजे, मूत्रविसर्जन योग्य प्रकारे केले पाहिजे;

मात्र या गोष्टी महिलांकडून टाळल्या जातात. त्याला काही वैयक्तिक, तर काही सामाजिक कारणे आहेत. महिलांनी किडनीविकाराच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर हा त्रास जीवघेणा ठरू शकतो..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe