कॅन्सर म्हटले की आजही लोकांच्या काळजात धडकी भरते. कॅन्सर या रोगावर आता अनेक उपचार उपलब्ध असले तरीही हा आजार आजही जीवघेणाच मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे एक कोटी लोक कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात.
कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी हेदेखील त्यापैकी एक कारण आहे. यासंदर्भात ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ५ ते १० टक्के कॅन्सर जेनेटिक म्हणजेच आनुवंशिक असतो.
मात्र कॅन्सरचे बाकी सर्व प्रकार आपल्या जीवनशैलीशी आणि खाण्यापिण्याच्या सवयींशी संबंधित असतात. दररोज सकाळी आपण ब्रेकफास्टमध्ये काही चुकीच्या पदार्थांचा समावेश करतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
आपल्यापैकी बहुतांश लोक रोज सकाळी नाश्ता किंवा ब्रेकफास्ट म्हणून चहा आणि त्याच्यासोबत बिस्किटे खातो. परंतु असे करणे कॅन्सरला आमंत्रण देण्यासारखे असते, याची बहुधा आपल्याला कल्पनाही नसते.
इम्पिरियल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने २ लाख लोकांवर केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की, ब्रेकफास्टमध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. रोज नाश्त्याला ब्रेड खाणे आरोग्यासाठी हानीकारक ठरते.
त्यामुळे महिलांमध्ये ओव्हरीयन कॅन्सरचा धोका वाढतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने अभ्यासात सांगितले आहे की, आईस्क्रीम, ब्रेकफास्ट सेरिएल्स, हॅम्बर्गर आदी पदार्थ नियमित खाल्ल्याने कॅन्सरचा धोका दुपटीने वाढतो. काहीजण नाश्त्याला चहाबरोबर बटाट्याचे चिप्स खातात, पोटॅटो चिप्स आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. तेही कॅन्सरचे एक कारण ठरते.