संतुलित आहार हा आपल्या शरीराच्या सुदृढ आरोग्याकरिता खूप महत्त्वाचा असून संतुलित आहारामध्ये हिरव्या भाजीपाला तसेच फळे व दुग्धजन्य पदार्थ व चिकन किंवा मटन सारखे मांसाहारी पदार्थांचे खूप महत्त्व आहे. कारण संतुलित आहाराच्या माध्यमातून शरीराच्या चांगल्या आरोग्या करिता आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची पूर्तता होते व शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.
परंतु कित्येक जणांना बऱ्याच भाज्या या आवडत नाहीत किंवा बरेच जण खात नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर कारले हे चवीला कडू असल्यामुळे बऱ्याच लोकांना कारले खायला आवडत नाही व तशीच परिस्थिती ही गवारीची देखील दिसून येते. कारण बरेच जण गवारीची भाजी खात नाहीत.
परंतु जर गवारीची भाजी खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे जर पाहिले तर ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण गवारीमध्ये विटामिन ए, बी, सी तसेच के हे जीवनसत्त्वे भरपूर असतात व त्यासोबत कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम देखील मोठ्या प्रमाणावर असते व त्यासोबतच फायबर देखील असते. या सगळ्या पोषक घटकांचा शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
गवारीची भाजी खाण्याचे अद्भुत फायदे
1- डायबिटीस असलेल्यांसाठी फायदेशीर– आहारामध्ये जर गवारीची भाजीचा समावेश केला तर त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच रक्तातील साखरेच्या पातळीत एखाद्या वेळेस झपाट्याने चढ-उतार होत असतो तो देखील होत नाही. त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी गवारीची भाजी खाणे खूप फायद्याचे आहे.
2- हाडांच्या चांगल्या आरोग्याकरिता– गवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमचे प्रमाण असते व त्यामुळे त्याचा फायदा हाडांना होतो.गवारीची भाजी खाल्ल्यामुळे हाडांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो व गवारीमध्ये फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
3- पचण्यासाठी फायदेशीर– गवारीची भाजी पचनासाठी खूप फायदेशीर आहे. ही भाजी खाल्ल्यामुळे आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते व त्यामुळे पचनक्रिया सुधारते. पोटातून काही विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि पचना संबंधित जर काही समस्या असतील तर त्या दूर करण्याला यामुळे मदत मिळते.
4- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर– शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी गवारीची भाजी उपयुक्त ठरते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर तसेच पोटॅशियम असते व यामुळे हृदयाला होणाऱ्या अनेक समस्यांपासून वाचता येते.
5- ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते– गवारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात व हे गुणधर्म उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहेत. मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो व अशा परिस्थितीत गवारीची भाजी खाल्ल्याने फायदा मिळतो.
6- मासिक पाळीसाठी फायदेशीर– गवारीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी मध्ये खूप मोठा फायदा मिळतो. मासिक पाळीमध्ये जो काही त्रास होत असतो तो गवारीच्या भाजीच्या सेवनामुळे काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकतो.