पुणे शहरासाठी ‘झिका’ ठरतोय डोकेदुखी, आठवड्याभरात वाढले ११ रुग्ण, गर्भवती मातांचे सर्वेक्षण सुरू !

Ahmednagarlive24 office
Published:

पुणे शहरात झिकाचा प्रादुर्भाव तापदायक ठरू लागला आहे. पुण्यात आठवडाभरात झिकाचे एकूण ११ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पाच गर्भवती मातांचा समावेश असल्यामुळे आरोग्य विभागाकडून झिकाचा उद्रेक झालेल्या परिसरातील गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून संशयित मातांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गर्भधारणेदरम्यान किंवा – बाळाच्या जन्मादरम्यान लैंगिक – संबंध, रक्तदान आणि संक्रमित – आईपासून तिच्या बाळाला झिका – विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. संसर्ग झाल्यास बाळामध्ये ‘मायक्रोसेफली’ (मेंदूची अपुरी वाढ) सारखे जन्मदोष, तसेच इतर न्यूरोलॉजिकल विकार होऊ ‘शकतात.

त्यापैकी काहींची लक्षणे मूल मोठे झाल्यावर दिसू शकतात. त्यामुळे झिका प्रादुर्भावात गर्भवती मातांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शहरात सध्या झिकाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. झिकाच्या एकूण नऊ रुग्णांपैकी मुंढवा, एरंडवणा, पाषाण आणि आंबेगाव बुद्रुक परिसरातील पाच गर्भवती मातांचा समावेश आहे.

त्यामध्ये एरंडवणा येथील २२ आठवडे गर्भवती असलेल्या मातेचे एनोमली स्कॅन करण्यात आले. त्याचा अहवाल नॉर्मल आला आहे. तर याच परिसरात दुसरी माता १६ आठवड्यांची गर्भवती आहे.

वारजे-कर्वेनगर, कोथरूड- बावधन, मुंढवा, औंध-बाणेर आणि सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सापडलेल्या झिकाबाधित परिसरात आरोग्य विभागाकडून गर्भवती मातांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये दवाखान्यांतर्गत एकूण गरोदर मातांची संख्या ६८२ इतकी आहे.

तर झिका उद्रेक झालेल्या भागातील गरोदर मातांची संख्या ९१ आहे. त्यानुसार संशयित २५ गरोदर मातांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गर्भवती मातांनी घ्यावयची काळजी

झिका प्रभावित भागातील प्रवास टाळावा लांब बाह्यांचे शर्ट आणि लांब पँट घाला ज्या घरात वातानुकूलित किंवा खिडकीला पडदे आहेत अशा घरात राहा ■ सुरक्षित असलेले डास प्रतिबंधक वापरा लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; आवश्यक तपासण्या करून घ्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करा.

एडिस प्रजातीच्या डासांची उत्पत्ती ठिकाणे सापडत आहेत. ती नष्ट करणे व औषध फवारणी करणे सुरू आहे. पाणी साचलेल्या जागा मालकांना दंडही केला जात आहे. मात्र, ही उत्पत्ती होऊच नये यासाठी इमारतीमधील प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साचू देऊ नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा. असे पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe