देशभरात कोरोनाने थैमान घालायला सुरवात केली आहे. व्हायरसचा संसर्ग वेगानं वाढत असून विविध माध्यमातून त्याची लागण होताना दिसत आहे. राजस्थानमध्ये एटीएममधून कोरोनाचं संक्रमण झाल्याची घटना ताजी असतानाच आता सलूनमधून कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाच्या काळात सलूनमध्ये जाऊन केस कापल्याने 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केस आणि दाढी करणाऱ्यानं सर्वांना एकच अॅप्रन वापरल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण गाव सील केलं असून ग्रामस्थांना होम क्वारंटाइन केलं आहे. खरगोन इथल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्येश वर्मांनी दिलेल्या माहितीनुसार इंदूरमधील हॉटेलमध्ये काम करणारे बडगाव इथला एक तरुण गावी परत आला आणि स्थानिक सलूनमध्ये केस कापले.
त्याचसोबत त्याने दाढीही केली. त्यानंतर तरुणाची तब्येत बिघडल्यानं त्याची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं. सलूनमध्ये गेलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली.
त्यापैकी एकूण 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर तातडीनं गाव सील करण्यात आलं आहे.मध्य प्रदेशातील बडगाव इथे आतापर्यंत 60 जण कोरोनाग्रस्त आहेत.