अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात गैरप्रकार घडल्याचा आरोप करत सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या चार पराभूत नेत्यांनी रविवारी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
याबरोबरच निवडणूक निकालाची समीक्षा करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे. प्रतिष्ठित नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनासुद्धा पराभूत व्हावे लागले आहे, हे विशेष.बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावणारे अलोरानी सरकार, संग्राम कुमार दोलाई, मानस मजुमदार आणि शांतिराम महतो यांचा निसटता पराभव झाला आहे.
निवडणूक निकालात अंतिम क्षणी गैरप्रकार करत आपणास पराभूत केल्याचा आरोप त्यांनी केला. या सोबतच चारही नेत्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
त्यावर सुनावणी झाली असता खंडपीठाने सर्वांचा युक्तिवाद ऐकून घेतला. अलोरानी सरकार यांनी बोनगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली. येथे भाजपचे स्वपन मजुमदार यांनी अवघ्या २००८ मतांनी बाजी मारली.
मजुमदार यांनी खोटे शैक्षणिक दस्तावेज दिल्याचा आरोप अलोरानी यांनी केला. संग्राम कुमार दोलाई हे मोयना मतदारसंघातून मैदानात उतरले होते. येथे भाजपचे अशोक डिंडा हे १२६० मतांनी विजयी झाले. मतमोजणीत डिंडा यांनी हस्तक्षेप केला, असे दोलाई यांचा दावा आहे.
तृणमूलचे मानस मजुमदार यांनी गोघाट मतदारसंघातून निवडणूक लढली. तेथे भाजपचे विश्वनाथ करक यांनी विजय संपादन केला,
तर तृणमूलचे शांतिराम महतो यांना बलरामपूर मतदारसंघातून अवघ्या ४२३ मतांनी पराभव पत्कारावा लागला आहे. तृणमूलच्या या चारही नेत्यांच्या याचिकांवर विविध तारखांना सुनावणी होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम