७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: चीनमध्ये उद्रेक झालेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) भारतातही शिरकाव झाला असून, सोमवारी एकाच दिवसात कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एक असे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे हे तीनही रुग्ण लहान बालके आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाबाहेर कधीही प्रवास केलेला नाही.
देशातील संसर्गाचा चीनमधील उद्रेकाशी संबंध नसल्याचे तसेच श्वसनाशी संबंधित विकारांच्या संभावित साथीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीतून जग सावरलेले असताना या नव्या चिनी विषाणूमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.
सर्वप्रथम सोमवारी सकाळी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ३ महिन्यांची एक मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. ब्रोंकोन्यूमोनिया झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीला बॅपटिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेथे चाचणीत तिला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले.मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच तिला रुग्णालयातून घरीदेखील सोडण्यात आले. ८ महिन्यांचा बालकसुद्धा ब्रोंकोन्यूमोनियामुळे याच रुग्णालयात दाखल असून, त्यालादेखील एचएमपीव्हीचा संसर्ग झाला आहे.
आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कर्नाटकनंतर गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या एका मुलाला या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली.
सर्दी, तापामुळे गेल्या १५ दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या या मुलावर उपचार सुरू आहेत. काही दिवस त्याला व्हेंटिलेटरवरदेखील ठेवण्यात आले होते. संध्याकाळपर्यंत तामिळनाडूमध्येदेखील दोन मुलांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले. या दोन्ही मुलांवर दोन स्वतंत्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
एचएमपीव्हीच्या शिरकावानंतर या तीनही राज्यांसोबत इतर राज्यांमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, उच्चस्तरीय बैठका घेऊन नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी बंगळुरूतील रुग्ण हे देशातील एचएमपीव्हीचे पहिले रुग्ण असल्याचे म्हणता येणार नाही, असा दावा केला आहे.
देशात या विषाणूचा आधीच संसर्ग झाला आहे. त्याची लागण झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात. हा कोरोनाप्रमाणे भीतीदायक नाही.त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. हिवाळ्यात श्वसनाशी संबंधित होणाऱ्या विकारांप्रमाणेच हा आजार आहे, असे राव यांचे म्हणणे आहे.
एकीकडे कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र सरकार चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे दिल्ली सरकारने रुग्णालयांना श्वसनाशी संबंधित आजारांच्या रुग्णवाढीसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
चीनमध्ये या विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून, रुग्णालयांमध्ये लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र दर हिवाळ्यात श्वसन विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने घाबरण्याची गरज नाही, असा दावा चीनने केला आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचना
काय करावे :
खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यूने झाकून ठेवा.
साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक पदार्थ खा
संसर्ग कमी करण्यासाठी हवा खेळती राहील याची दक्षता घ्या.
काय करू नये :
हस्तांदोलन,टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा
घाबरू नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या व्हायरसमुळे लोकांनी घाबरू नये.केंद्र आणि राज्य यांच्यात याविषयी चर्चा झाली आहे.मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.केंद्रीय आरोग्य विभागाबरोबर ऑनलाईन बैठकही झाली असून,या संदर्भातील नियमावलीही जाहीर केली जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.हा व्हायरस नवीन नाही. यापूर्वीही हा व्हायरस आला होता.राज्याच्या आणि केंद्रीय आरोग्य खात्याकडूनही योग्य ती उपाययोजना केली जात आहे,असे ते म्हणाले.