आग्रा :- मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आग्रा शहरातून समोर आली आहे जिथे एका व्यक्तीने आपल्याच मित्राची अतिशय निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
आग्रा शहरात राहणाऱ्या धर्मेंद्र तिवारी हा तेथील तहसीलदार कार्यालयात कागदपत्रं टाइप करण्याचं काम करत होता.मागील महिन्यात १८ ऑक्टोबरला घरी परतत असताना तो अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार अछनेरा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेणंही सुरु केलं होतं. पण आता याप्रकरणी पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. बेपत्ता असलेल्या धर्मेंद्र याची हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात धर्मेंद्रची हत्या ही त्याच्याच एका खास मित्राने केली असल्याचं समोर आलय,याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीत असं म्हटलं आहे की, ‘आरोपी ललित याने आपला मित्र धर्मेंद्र याला आपल्या घरी बोलावलं होतं. त्यानंतर कॉफीमध्ये गुंगीचं औषध देऊन त्याला बेशुद्ध केलं.’
‘ललितचं प्लॅनिंग असं होतं की, धर्मेंद्रच्या घरच्यांकडून त्याला पैसे उकळायचे होते.कारण धर्मेंद हा तसा श्रीमंत घरातील होता. यासाठी त्याने सुरुवातीला धर्मेंद्रला बेशुद्ध करुन नंतर त्याच्या तोंडावर टेप चिटकवली. पण तोंड बांधण्याच्या नादात श्वास कोंडल्याने धर्मेंद्रचा मृत्यू झाला.
ज्यानंतर त्याने त्याचा मृतदेह कुठे लपवायचा याचा विचार सुरु केला. सुरुवातीला त्याने धर्मेंद्रच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे कुकरमध्ये शिजवून नंतर जाळून देखील टाकले.
धक्कादायक म्हणजे मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवत असताना त्याचा दुर्गंध येऊ नये यासाठी तो घरात सतत अनेक अगरबत्त्या देखील लावून ठेवायचा.मृतदेहाचे काही मोठे तुकडे हे त्याने नाल्यात फेकून दिले. अशाप्रकारे त्याने संपूर्ण मृतदेहाची विल्हेवाट लावली. या संपूर्ण कामात आरोपी ललितच्या आईने देखील त्याला मदत केली होती.