नवी दिल्ली : कोरोना या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८४ वर पोहचला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूची लागण झालेले दहा जण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत.
कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्याने आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया कोषातून मदत मिळवू शकतात.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी यासंदर्भातील एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी तसेच कोरोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्या आणि यादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनादेखील ही मदत मिळेल.